वाटसरूंची तहान भागविणारे मुंबईतील प्याऊ दुरावस्थेत..!
By सीमा महांगडे | Published: February 8, 2024 10:33 AM2024-02-08T10:33:54+5:302024-02-08T10:34:34+5:30
पालिका २५ पाणपोयांची करणार डागडुजी.
सीमा महांगडे, मुंबई : जुन्या पाणपोयांचे संर्वधन पालिका करत असली तरी मुंबई शहर, उपनगरातील सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधींमार्फत उभारलेल्या पाणपोयांची स्वच्छता, दुरवस्था, अतिक्रमण प्रश्न कायमच राहिला आहे. रेल्वेस्थानकांबाहेर, बसस्थानकांजवळ किंवा बाजारपेठांजवळ असलेल्या पाणपोयांकडे गर्दी होत असते. मात्र, त्यांच्या देखभालीचा प्रश्न उद्भवल्यानंतर या पाणपोयांकडे दुर्लक्ष होते. मात्र, येत्या काळात पालिकेच्या इमारत परिरक्षण विभागाकडून या पाणपोयांचे संवर्धन होणार आहे.
उन्हाळा सुरू झाला की सामाजिक संस्थांच्या पाणपोयांकडे अनेकांचे पाय वळतात. पालिकेच्या २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात २५ पाणपोयांचे हेरिटेज कक्षाकडून संवर्धन केले जाणार आहे. पाणी हा सर्वश्रेष्ठ धर्म समजला जाण्याच्या या काळात पारशी, गुजराती, जैन, मारवाडी, मराठी अशा विविध समाजांतील दानशूर व्यक्ती, तसेच संस्थांनी ठिकठिकाणी पाणपोया बांधल्या.
२९ पाणपोया पालिकेच्या अखत्यारीत :
२९ पालिकेच्या अखत्यारीत आहेत. २०१६ मध्ये बोरीबंदर येथील जीपीओसमोरील देवीदास प्रभुदास कोठारी पाणपोईची डागडुजी करण्यात आली. पुढच्या टप्प्यात आनंद विठ्ठल कोळी व सर कावसजी जहांगीर या काळाचौकीतील पाणपोयांचा विकास करण्यात येणार आहे.
अनेक पाणपोया या ऐंशी ते शंभर वर्षे जुन्या आहेत. जुन्या काळातील वास्तुशैली जतन करून त्याचे सौंदर्य जपले जाणार आहे. पाणपोई कधी बांधली, तिची माहिती, पाण्याचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे. नवीन पद्धतीत पाणी साठवण्यासाठी टाक्या बांधाव्या लागणार आहेत. पाणपोयांना ‘क्यूआर कोड’ दिले जाणार आहेत. - राहुल चेंबूरकर, वास्तुविशारद, वास्तू विधान
खासगी पाणपोयांची स्थिती खेदजनक :
सामाजिक संस्था किंवा लोकप्रतिनिधींच्या निधीमार्फत काही पाणपोया मुंबईत सुरू आहेत. मात्र त्याही जुन्या झाल्या आहेत. या पाणपोयांना पालिका पाणी देते आणि त्यासाठी दर आकारते.
पाणपोयांची स्वच्छता, त्याची देखभाल, दुरुस्ती ही सामाजिक संस्थांकडून होते. त्यावर पालिकेचा संबंधित विभागही लक्ष ठेवतो. मात्र, त्यांचे संचालन, देखभाल व्यवस्थित होत नसल्यास पाहणी करून त्या बंद केल्या जातात.
शंभरहून अधिक पाणपोया :
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, एकेकाळी मुंबईत कुलाबा ते शीव या पट्ट्यात शंभरहून अधिक पाणपोया होत्या.
मुंबईच्या वाढत्या विकासात यातील असंख्य पाणपोया नष्ट झाल्या, तर काहींकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची दुरवस्था होऊन त्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
यातील काही ठिकाणी अस्वच्छता, दुर्गंधी असते. त्यामुळे पाणी असूनही कुणी तिथे फिरकत नाही.