ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - सतीश सबनीस फाऊंडेशन आणि शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २१ मे पासून चौथ्या सतीश सबनीस ओपन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शिवाजी पार्क जिमखाना येथे भरवण्यात आली असून त्यात सहभाग घेऊ इच्छिणारे खेळाडू 20 मे पर्यंत शिवाजी पार्क जिमखाना येथे प्रत्यक्ष जाऊन अथवा www.shivajiparkgymkhana.com या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करू शकतील.
शिवाजी पार्क जिमखाना येथे 21 मे रोजी सकाळी 9 वाजता सुरू होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांसाठी एकूण एक लाख 51 हजार रूपयांची बक्षिसे देण्यात येणार असून स्पर्धकांसाठी 600 रूपये प्रवेश शुल्क आहे. या स्पर्धेत 6 वर्षे वयोगटापासून खेळाडू सहभागी होऊ शकतील. स्पर्धेतील विजेत्यांना 21 हजार रूपये तर उपविजेत्यांना 15 हजार रूपयांचे बक्षीस देण्यात येईल. यावेळी शिवाजी पार्क जिमखान्याच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह सतीश सबनीस फाऊंडेशनचे सदस्य, तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.
सतीश सबनीस ओपन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेविषयी- सतीश सबनीस फाऊंडेशन आणि झेन लाइव्ह मीडियाचे प्रमुख मिलिंद सबनीस यांचे वडील स्वर्गीय सतीश सबनीस हे भारतीय बुद्धिबळ क्षेत्रातील एक नावाजलेले व्यक्तिमत्व होते. त्यांना स्वत:ला बुद्धिबळाची प्रचंड आवड आणि ज्ञान होते. ते स्वत: अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये खेळले होते. भारतीय बुद्धिबळपटूंना चांगले व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने त्यांनी 1984 मध्ये प्रथम आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. इतकेच नाही तर त्यांनी 1986मध्ये दुबई बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे व्यवस्थापकपदही भूषविले होते. भारताचा ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंद याचा हा पहिला परदेश दौरा होता. ग्रॅण्डमास्टर प्रवीण ठिपसे, अभय ठिपसे, भाग्यश्री साठे अशा प्रथितयश बुद्धिबळपटूंना सतीश सबनीस यांनी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले होते.