नागपूर/ मुंबई- अनेक काँग्रेस नेत्यांचे वकीलपत्र घेतलेले आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात खटला दाखल करणारे ॲड. सतीश उके यांच्या घरी गुरुवारी पहाटे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापा टाकला. सहा तास कसून चौकशी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी ॲड. उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके यांना अटक केली. त्यानंतर आज सतीश उके यांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर सतीश व प्रदीप उके यांना अटक करण्यात आली. आता ईडीनं सहा एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. नागपुरातून उके यांच्या घरी ईडीने धाड टाकली. पाच तास चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले होते. मुंबईत आणल्यानंतर पीएमएल कोर्टात न्यायाधीश गिरीश गुरव यांच्यासमोर हजर केले. ईडीने वकील हितेन बेनेगावकर यांनी सतीश आणि त्यांचा भाऊ प्रदीप यांच्या चौदा दिवसांच्या कोठडीची मागणी केली. मात्र त्यांना सहा एप्रिलपर्यंत कोठीडी देण्याचा निर्णय देण्यात आला.
पुरावे नष्ट करण्यासाठी छापा -
ॲड. उके यांच्या लॅपटॉपमध्ये फडणवीस यांच्याविरुद्धच्या केसेस, न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरण, निमगडे खून प्रकरणाचे पुरावे होते. ते पुरावे नष्ट करण्यासाठीच हा छापा घातला गेला व लॅपटॉप जप्त केल्याचा आरोप प्रदीप उके यांनी केला.
असे आहे प्रकरण-
एका ६० वर्षीय महिलेने उके यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी धमकावून जमीन बळकावल्याची तक्रार केली. गुन्हे शाखेने अनेक तास चौकशी केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र, ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. ईडीने टाकलेला छापा हा त्याच अनुषंगाने असू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.