सॅटीसने घेतला मोकळा श्वास
By Admin | Published: January 30, 2015 10:51 PM2015-01-30T22:51:34+5:302015-01-30T22:51:34+5:30
मंगळवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सॅटीसची पाहणी केली आणि त्याचा इफेक्ट आता झाला असून या परिसरात असलेली
ठाणे : मंगळवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सॅटीसची पाहणी केली आणि त्याचा इफेक्ट आता झाला असून या परिसरात असलेली अतिक्रमणे हटविली आहेत. तसेच येथील फेरीवाल्यांवरसुद्धा कारवाई झाली आहे. या परिसरात पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याबाबतचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
सॅटीस प्रकल्प हा ठाण्याचा मानबिंदू ठरला असून त्याची निर्मिती झाल्यानंतर तो अतिक्रमणमुक्त आणि फेरीवालामुक्त राहील, अशी ग्वाही सुरुवातीलाच पालिकेने दिली होती. परंतु, सॅटीसच्या खाली आणि नंतर सॅटीसच्या वरसुद्धा अनधिकृत फेरीवाल्यांनी परिसर व्यापून टाकला होता. विशेष म्हणजे सॅटीसच्या खालील बाजूस अनधिकृत पार्किंग होत असल्याने त्याचा नाहक त्रास येथे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागत होता. तत्कालीन आयुक्त आर.ए. राजीव यांनी तर सॅटीस फेरीवालामुक्त करण्याचा दावा करून त्यानुसार कारवाई केली होती. तसेच तीन शिफ्टमध्ये पालिकेचे कर्मचारी नियुक्त केले होते. परंतु, कालांतराने हे कर्मचारी गायब झाले आणि पुन्हा सॅटीस फेरीवाल्यांनी व्यापला गेला. पालिका येथे वारंवार थातूरमातूर कारवाई करीत सॅटीस फेरीवालामुक्तीचा गवागवा करीत होती. नवनियुक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मंगळवारी सॅटीसची पाहणी करून येथील फेरीवाले, अनधिकृत पार्किंग आणि प्रवाशांच्या टीएमटीच्या बस संदर्भात समस्या सुटाव्यात, यासाठी संबंधित विभागाला आदेश दिले होते. त्यानंतर, तीन दिवसांपासून पालिकेच्या अतिक्रमण विभागाने येथे फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे. (प्रतिनिधी)