Join us

डेंग्यूमुळे सातपाटीत महिलेचा मृत्यू

By admin | Published: April 06, 2015 10:51 PM

सातपाटी येथील लता दयाराम तरे या ४९ वर्षीय महिलेचा डेंग्यूने बळी घेतला. रस्त्यावर वाहणारी गटारे, पाणी साठवण्याच्या उघड्या टाक्या यांमुळे

पालघर : सातपाटी येथील लता दयाराम तरे या ४९ वर्षीय महिलेचा डेंग्यूने बळी घेतला. रस्त्यावर वाहणारी गटारे, पाणी साठवण्याच्या उघड्या टाक्या यांमुळे डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत एका महिलेचा डेंग्यूने नाहक बळी गेल्याची संतप्त भावना नागरीकांमधून व्यक्त केली जात आहे. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याची चर्चा आहे.सातपाटी खारीबाव जवळ राहणाऱ्या लता तरे या ३-४ महिन्यापासून ताप, सर्दी, खोकल्याने आजारी होत्या. त्यांना मागच्या आठवड्यात पालघरच्या एका खाजगी रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची तब्येत ढासळल्याने त्याना गुजरातमधील हरिया एल.जी. रोटरी हॉस्पिटल येथे रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांचा काही फायदा झाला नाही आणि त्यांचा मृत्यू ओढवला. तेव्हाच त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले.सातपाटीमध्ये रस्त्यारस्त्यावर वाहणारी गटारे, कचऱ्याचे साम्राज्य उघड्यावर पाणीसाठा केल्याने डासांचे वाढते प्राबल्य यामुळे सर्व सामान्य नागरीक त्रस्त झाला आहे. सातपाटीत मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढला असताना ग्रामपंचायतीकडून पुरेशी धूर फवारणी, औषध फवारणी केली जात नव्हती. आरोग्य सभापतीचे याकडे पुर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही माजी सभापती जगदीश नाईक यांनी केला आहे. सातपाटी गावामध्ये विकासाचे परिवर्तन करण्याच्या नावावर मतदारांनी परिवर्तन समितीला निवडून दिले असताना अनेक पक्षाची मोट बांधलेली परिवर्तन समितीमध्ये एकमेकांत समन्वयच नसल्याने सातपाटी गावाच्या विकास खुंटत चालला आहे. त्यातच गावातील अनेक समस्यांकडे लक्ष पुरविण्यास ग्रामविकास अधिकारी निलेश जाधव यांना वेळ नसल्याने गावातील स्वच्छता, पाणी, अतिक्रमणे इ. समस्यांनी उग्र स्वरूप धारण केले आहे. गावातील गटाराचे योग्य नियोजन न केल्याने संपूर्ण गावात अस्वच्छतेचे वातावरण वाहत आहे. (वार्ताहर)