Join us

दुपारी १२ वाजता ढोल-ताशा वाजवा, बुंदीचे लाडू वाटा; बच्चू कडूंनी सांगितली वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 9:58 PM

महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवाना जाहीर आवाहन करतो की, सरकारने आपली २५ वर्षाची मागणी मान्य केली आहे.

अमरावती/मुंबई - रुग्णसेवा आणि दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढणारा नेता म्हणून आमदार  बच्चू कडू यांची राज्यभर ओळख आहे. मात्र, शिंदे गटासोबत गेल्यानंतर बच्चू कडू यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यावरुनही कडू यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, मी काम करणारा कार्यकर्ता आहे, मी माझ्या मतदारसंघातील कामासाठी प्रयत्न करणारा आहे, असे म्हणत मंत्रीपदापेक्षा मला लोकांसाठी होणारी काम महत्त्वाची असल्याचंही कडू यांनी म्हटलं होतं. आता, आमदार बच्चू कडू यांची आजपर्यंतची सर्वात मोठी मागणी मान्य झाली आहे. गेल्या २० ते २५ वर्षांपासून कडू यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नाला मोठं यश आलं आहे. त्यामुळे, या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्याचं आवाहन बच्चू कडू यांनी दिव्यांग बांधवानां केलं आहे.  

महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवाना जाहीर आवाहन करतो की, सरकारने आपली २५ वर्षाची मागणी मान्य केली आहे. या गोष्टीच्या स्वागतासाठी प्रत्येक जिल्ह्यात १२ नोव्हेंबर, शनिवार रोजी दुपारी १२ वाजता ढोल ताशाच्या गजरात या निर्णयाचे स्वागत व जल्लोष झाला पाहिजे, असे टविट करुन बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्या सर्वच कार्यकर्त्यांना ढोल-ताशा वाजवण्याची विनंती केली आहे. 

प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या सर्वच जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख दिव्यांग बांधवांना माझी नम्र आवाहन आहे की, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने १०० दिवस  होण्यापूर्वीच आपली गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी पूर्ण केली आहे. ज्यासाठी, आपण आंदोलने केली, कित्येक गुन्हेही अंगावर घेतले. ३ डिसेंबर रोजी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाच्या या निर्णयाची घोषणा होत आहे. त्यामुळे, ज्या ताकदीने आपण आंदोलन करतो, त्याच ताकदीने प्रत्येक जिल्ह्यात ढोल-ताशा घेऊन शनिवारी दुपारी १२ वाजता बुंदीचे लाडू वाटावे, अशी विनंती आमदार बच्चू कडू यांनी केले. तसेच, आज माझं नाव होत असलं तरी तुमची ताकद माझ्यामागे होती, त्यामुळेच हे शक्य होत आहे, असेही कडू यांनी म्हटले. 

दिव्यांग मंत्रालयास मान्यता

दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय आज झाला. 20 ते 25 वर्षापासून ज्याची प्रतीक्षा होती तो निर्णय आज झाला. मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय झाला, असे बच्चू कडू यांनी बुधवारी सांगितले. विशेष, म्हणजे बच्चू कडू यांच्यासाठी खास कॅबिनेट खातं तयार केलं जाईल अशी माहितीही त्यांनी दिली होती. शिंदे गटात गेलेले बच्चू कडू यांच्यासाठी देशातील पाहिलं दिव्यांग मंत्रालय उभं केलं जाणार आहे. पुढील मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाणार असून दिव्यांग यांच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभं केलं जाणार आहे. 3 डिसेंबरला याची घोषणा केली जाणार असल्याची माहिती कडू यांनी दिली. तसेच, आज या गोष्टीचा सर्वाधिक आनंद असल्याचंही त्यांनी म्हटलं. 

टॅग्स :बच्चू कडूएकनाथ शिंदेमंत्रीदिव्यांग