गणपत पाटील नगरातील १९ वर्षीय सत्यम यादवची सैन्यदलात निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:05 AM2021-04-06T04:05:47+5:302021-04-06T04:05:47+5:30
मनोहर कुंभेजकर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : धारावीनंतर आशियातील गणपत पाटील नगर ही मोठी झोपडपट्टी आहे. दहिसर पश्चिमेकडील गणपत ...
मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : धारावीनंतर आशियातील गणपत पाटील नगर ही मोठी झोपडपट्टी आहे. दहिसर पश्चिमेकडील गणपत पाटील नगरमध्ये पत्र्याच्या घरात राहणाऱ्या १९ वर्षीय सत्यम यादव या तरुणाची भारतीय सैन्यदलात निवड करण्यात आली आहे.
सत्यमचे वडील एका खासगी कंपनीत कामाला असून आई गृहिणी आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सत्यमने अभ्यास केला. बोरीवलीत दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर सत्यम याने भारतीय सैन्य दलात जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाला आईवडिलांनीही पाठिंबा दिला.
सत्यमने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना दिले तसेच येथील उद्यानात आपल्या कवायतीसाठी जादा वेळ दिला जात असल्याचे सांगितले. सत्यम सध्या नाशिक येथे भारतीय सैन्यदलाच्या प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आहे. त्याच्या मोबाइलवर असलेली ‘हिंदुस्तान मेरी आन, मेरी शान मेरी जान हिंदुस्तान’ ही रिंगटोन त्याच्या देशप्रेमाबद्दल बरेच काही सांगून जाते, तर आपल्या मुलाची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याचा अभिमान असल्याचे त्याच्या आईवडिलांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेनेचे माजी नगरसेवक, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर यांनी रविवारी सत्यमच्या घरी जाऊन त्याचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच यापुढे सत्यमला कोणतीही मदत लागल्यास त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे आश्वासन दिले. गणपत पाटील नगरसारख्या लोकवस्तीत राहून सत्यमने भारतीय सैन्य दलात प्रवेश करून तरुणांपुढे आदर्श निर्माण केल्याचे घोसाळकर यांनी सांगितले.
........................