मुंबई : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री' निवासस्थानी भेट घेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शविला. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि भाजपचा पराभव होणार आहे. महाविकास आघाडीला माझा पाठिंबा असेल. निवडणुकीत मी प्रचार सभांसाठी येणार आहे. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करीत आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक देशातील राजकीय परिस्थितीवर परिणाम करेल, असेही ते म्हणाले.
पुलवामामध्ये हल्ला झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी भाजपने या घटनेचे राजकीयकरण केले. त्यामुळे लोकांनी मतदान करताना या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. २०१९ च्या पुलवामा हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवानांचा मृत्यू झाला.
या हल्ल्याची व्यापक चौकशी व्हावी अशी मागणी मी केली. लोकांना आपले जवान कसे मारले गेले हे कळले पाहिजे. जवान शहीद होण्याला कोण जबाबदार आहे, हे लोकांसमोर आले पाहिजे, असेही मलिक म्हणाले.