Join us

सातपाटीचा बंधारा घालतोय राम नाईकांना साद

By admin | Published: November 21, 2014 12:01 AM

समुद्राला आलेल्या तुफानी लाटांच्या तडाख्याने सातपाटीच्या किनाऱ्यावरील शेकडो घरामधून निघालेला आक्रोश

सातपाटी : समुद्राला आलेल्या तुफानी लाटांच्या तडाख्याने सातपाटीच्या किनाऱ्यावरील शेकडो घरामधून निघालेला आक्रोश माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांच्या प्रयत्नाने उभारलेल्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याने थोपवून धरला होता. परंतु दहा वर्षानंतर लाटांच्या तडाख्याने तो खचल्याने महाकाय लाटांनी पुन्हा किनाऱ्यावरील घरांचा वेध घ्यायला सुरूवात केल्याने संकटात सापडलेल्या सातपाटीकरांचे लक्ष राम नाईक आपल्या भाषणातून या बंधाऱ्याच्या दुरूस्तीबाबत काय बोलतात याकडे लागुन राहणार आहे.सातपाटीच्या पश्चिमेकडील किनाऱ्यालगत बांधलेल्या घराना सन२००१ साली तुफानी लाटांचा तडाखा बसल्यानंतर तत्कालीन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांनी बीपीसीएल व राज्य शासनाच्या लोककल्याण निधीमधून २ कोटी ८५ लाख रू. च्या निधीचा १ हजार ३९० मीटरचा बंधारा बांधून दिल्याने सातपाटीकरांची अनेक घरे वाचली होती. परंतु कालांतराने आज दहावर्षानंतर तुफानी लाटांच्या जोरदार तडाख्याने या बंधाऱ्यातील दगड वाहुन गेले आहेत तर काही ठिकाणी भगदाडे पडून तो गाळरुपी मातीखाली गाडला गेला आहे. त्यामुळे मागील ३-४ वर्षापासून पुन्हा समुद्राच्या लाटांनी मच्छीमारांच्या घरांचे वेध घ्यायला सुरूवात केली आहे. माजी राज्यमंत्री राजेंद्र गावितांनी ५० लाखाच्या निधीतून हा बंधारा दुरूस्त करण्यासाठी केलेला प्रयत्न अपुरा पडू लागला. त्यामुळे पुन्हा घरांना धोका निर्माण झाला आहे. केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने व स्वत: राज्यपालपदी विराजमान असल्याने पुन्हा या रामनाईक बंधारा म्हणून ओळखला जाणाऱ्या बंधाऱ्यासाठी सत्कारादरम्यान राम नाईकांनी गोड बातमी जाहीर करावी अशी अपेक्षा सातपाटीवासीय ठेवून आहेत.