मुंबई - महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. या आघाडीकडून मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेणार आहेत. मात्र, संपूर्ण सत्तासंघर्षाच्या नाट्यात भाजपाची सगळ्यात मोठी कोंडी झाली. अजित पवारांना सोबत घेऊन भाजपाने सरकार स्थापन केलं. मात्र, अवघ्या साडेतीन दिवसात अजित पवारांनी राजीनामा दिला. त्यामुळे दिल्लीतील चाणक्यांची अखेरची खेळीही फेल ठरली. सिने अभिनेता आणइ भाजपाचे पूर्वाश्रमीचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला सुनावले आहे.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात, अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर भाजपा सरकार अल्पमतात गेलं. अखेर भाजपा सरकार कोसळलं. त्यामुळे अजित पवारांवर विश्वास का ठेवला? असा प्रश्न भाजपा नेत्यांमध्ये चर्चेत आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी विधिमंडळ नेते होते म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवला, तर याबाबत फडणवीसांनी योग्य वेळी बोलेन असं सांगून सस्पेन्स कायम ठेवला. याबाबत बुधवारी एका चॅनेलशी बोलताना अमित शहा म्हणाले की, अजित पवार हे राष्ट्रवादी आमदारांच्या विधिमंडळाचे नेते म्हणून निवडलेले होते. त्यांना सरकार बनविण्यासाठी निर्णय घेण्याचे अधिकार होते. राज्यपालांनीही सरकार बनविण्यावेळी त्यांच्याशी चर्चा केली होती. राष्ट्रवादीने पहिल्यांदा सरकार बनविण्यास समर्थता दाखविली त्या पत्रावरही अजित पवारांची स्वाक्षरी होती. आमच्याकडे पाठिंब्याचे जे पत्र आले त्यावर अजित पवारांची स्वाक्षरी होती. त्यामुळे भाजपाने त्यांना सोबत घेतले. मात्र, अजित पवारांनी घरवापसी केल्यानंतर भाजपा सरकार कोसळले. महाराष्ट्रातील भाजपाच्या या पराभवावरुन शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपावर टीका करत पवारांचे कौतुक केलंय. 'सौ सुनार की, एक पवार की' असं कॅप्शन लिहून शत्रुघ्न यांनी भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांवर टीका केलीय. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींचा फोटोही शेअर केला आहे. तसेच, ट्विटद्वारेही समाचार घेतलाय.
सर, घाई गडबडित निर्णय, निम्म्या रात्रीची नाटकं, त्याबद्दल दोघांचे अभिनंदन, लोकांनी सकाळचा चहाचा घोट घेण्यापूर्वीच सरकार बनविण्यात आलं. कुठलाही प्रोटोकॉल किंवा कॅबिनेट मिंटींगचा निर्णय नव्हता. ज्यामध्ये फक्त एका व्यक्तिचा गर्व आणि दोन लोकांचं सैन्य होतं. त्याचा भयानक निकाल समोर आला आहे, ( हे माझे नसून लोकांचे मत आहे) असे ट्विट शत्रुघ्न सिन्ह यांनी केलंय. दुसरीकडे महान मराठा नेता आणि आजचे लोहपुरुष शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रचे मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल हे दिग्गज नेते असतानाही तुम्हाला एवढी घाई कशाची झाली होती ? सर,. पवारांनी केंद्राच्या पायाखालची जमिन सरकावून दाखवली. त्यामुळेच हा फोटो व्हायरल होत असून मी तुम्हाला हा फोटो पाठवत आहे, असे म्हणत सिन्हा यांनी भाजपा नेत्यांवर केविलवाणी टीका केली.