‘सौंदर्या’चा काळाबाजार

By Admin | Published: April 6, 2016 04:23 AM2016-04-06T04:23:07+5:302016-04-06T04:23:07+5:30

इम्पोर्टेड लिपस्टिक, काजल, कॉम्पॅक्ट... तीन सौ का माल सौ में, पांच सौ का माल देडसौ में... ले लो..., असे शब्द कानावर पडले की ‘सौंदर्यखुळ्या’ महिला, तरुणींची पावले आपोआप त्या आवाजाच्या दिशेने वळतात

'Saundariya' black market | ‘सौंदर्या’चा काळाबाजार

‘सौंदर्या’चा काळाबाजार

googlenewsNext

मनीषा म्हात्रे, पूजा दामले , मुंबई
इम्पोर्टेड लिपस्टिक, काजल, कॉम्पॅक्ट... तीन सौ का माल सौ में, पांच सौ का माल देडसौ में... ले लो..., असे शब्द कानावर पडले की ‘सौंदर्यखुळ्या’ महिला, तरुणींची पावले आपोआप त्या आवाजाच्या दिशेने वळतात. तिथूनच सुरू होतो ‘सौंदर्याचा खेळ’. रोज कानावर पडणाऱ्या आवाजामागचा चेहरा शोधण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधींनी या बाजारांत शिरून ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. या सौंदर्याच्या बाजारातील ‘बनावटपणा’ आणि महिलांच्या सौंदर्याशी होणाऱ्या कोट्यवधींच्या खेळाचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने ‘स्टिंग आॅपरेशन’च्या माध्यमातून समोर आणले.
> प्रतिनिधी : मार्केट में कौनसा काजल ज्यादा बिकता है?
विक्रेता : लॅक्मे, मेबलिन.. ये दो-तीन प्रोडक्ट है. बॅ्रण्डेड माल बिकता है. तुम्हाला कोणता हवाय, मार्केटमध्ये तीन-चार ब्रॅण्ड चांगले आहेत. पण, आमच्याकडे त्यापेक्षा अधिक ब्रॅण्ड आहेत.
प्रतिनिधी : आम्हाला एक-दोन नाही, जास्त घ्यायचे आहेत? काही किंमत कमी होईल का?
विक्रेता : जास्त म्हणजे नक्की किती हवे आहेत? कशाला हवे आहेत?
प्रतिनिधी : कल्याणमध्ये दुकान सुरू करतोय. ५० पीस तरी पहिल्यांदा हवे आहेत.
विक्रेता : ओके. आमच्याकडे सगळे ब्रॅण्डेड आहेत. तुम्ही बल्कमध्ये घेणार म्हणून तुम्हाला मार्केटपेक्षा कमी किमतीला मिळेल.
प्रतिनिधी : पण, हा माल ओरिजनल आहे? याचे काही साइडइफेक्ट्स तर नाही ना?
विक्रेता : अहो, हे सगळे ब्रॅण्डेडच आहेत. कस्टममधून आणतो. हे पहा, एमआरपी आहे. कंपनीचा लोगो आहे. सगळे तसेच आहे. हे रस्त्यावर फिरतात, त्यांच्याकडे अजून कमी किमतीला मिळेल. पण, तो माल डुप्लिकेट असतो. त्यावर कंपनीचा लोगो नसतो. आम्ही इथेच धंदा करतो, माल खराब निघणार नाही. तुम्हाला माल हवा असेल त्याआधी दोन दिवस कळवा. तुम्हाला मिळेल. काहीच प्रॉब्लेम नाही.
> प्रतिनिधी : सध्या मार्केटमध्ये कोणत्या प्रोडक्टना आणि कंपन्यांना जास्त डिमांड आहे?
विक्रेता : हे बघा, या लिपस्टिक ब्रॅण्डेड नाहीत. पण बाजारात विकल्या जाणाऱ्या लिपस्टिकपेक्षा नक्कीच चांगल्या आहेत. क्वॉलिटी चांगली आहे. १०० रुपयांपासून तुम्हाला मिळतील. तुम्हाला किती माल घ्यायचा आहे? तुम्ही विकणार आहात का?
प्रतिनिधी : होय, कल्याणमध्ये आम्ही पार्टनरशिपमध्ये दुकान उघडतोय. तिथे ही कॉस्मेटिक प्रोडक्ट्स ठेवायची आहेत. मला एकदम ५० लिपस्टिक हव्या आहेत. त्या वेगवेगळ्या कंपनीच्या असतील तर उत्तम. क्रॉफर्ड मार्केट परिसरात रस्त्यावर नामांकित लिपस्टिक कमी पैशांत मिळतेय.
विक्रेता : हे बघा आमच्याकडे जे प्रोडक्ट आहेत ते कुठे मिळणार नाहीत. कारण, आमच्याकडे आम्ही तयार करून घेतो. बाजारात जे ब्रॅण्डेड प्रोडक्ट मिळतात, ते कॉपी असतात. ओरिजनल प्रोडक्ट विकल्यावर आम्हाला १० ते १५ टक्के मिळतात. ते आम्ही विकतो, तुम्हाला कॉपी हवी असले तरीही देऊ शकतो. आमच्याकडचे हे प्रोडक्ट मालक स्वत:च्या कारखान्यात तयार करून घेतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारे दुष्परिणाम होणार नाही. आधी तुम्ही ठरवा तुम्हाला समोरच्याला ओरिजनल द्यायचेय की कॉपी देणार आहात?
प्रतिनिधी : फर्स्ट कॉपी अथवा बनावट कसे ओळखायचे? याने काही साईड इफेक्ट होणार नाही ना?
विक्रेता : या प्रोडक्टमुळे काहीच साइडइफेक्ट होत नाहीत. कॉपी म्हणजे हलक्या दर्जाचे क्रीम अथवा काजळ वापरून ब्रॅण्डेड प्रोडक्टच्या नावाने ते विकले जाते. त्यातही फर्स्ट, सेकंड असे प्रकार आहेत. म्हणजे असे की, १०० रुपयांच्या काजळाच्या पेन्सीलमध्ये १० रुपयाला उपलब्ध असलेले काजळ टाकून विकले जाते. एखादे प्रोडक्ट फक्त नावाने विकले जाते. आत नेमके काय आहे? याच्याशी कुणाला घेणे-देणे नसते. अनेकदा यात काजळ, लिपस्टिक, फाउंडेशन जास्त वेळ टिकावे म्हणून केमिकल मिसळले जाते. सेकंड कॉपीमध्ये कव्हरला वरून प्लॅस्टिक लावलेले असते. तुम्हाला जर कॉपी हवी असेल, तर अवघ्या ६० रुपयांमध्ये देतो. तुम्ही ती २०० रुपयांना विकू शकता. धंद्यात आम्ही नेहमी इमानदारी दाखवतो. हा होलसेल रेट आहे मॅडम.
प्रतिनिधी : ओके. टे्रनमध्ये जो माल विकला जातो तो ते लोक कुठून आणतात? ते तर अवघ्या ३० रुपयांतही ते देतात.
विक्रेता : अहो मॅडम, तो ‘चायना’ माल असतो. तो डुप्लिकेट असतो. ती तर थर्ड कॉपी असते. अनेक छोट्या गाळ्यांमध्ये केमिकल्सचा वापर करून हा माल तयार केला जातो. त्यात ओरिजनल फक्त काही प्रमाणात असते. आमच्याकडेही तो माल आहे, पाहिजे का?
प्रतिनिधी : माल कधीपर्यंत मिळणार?
विक्रेता : तुम्ही कल्याणला असता ना. मग, इथे येऊन अ‍ॅडव्हान्स पेमेंट करायची गरज नाही. तुम्हाला अकाउंट नंबर देतो. त्यात अ‍ॅडव्हान्सचे पैसे ट्रान्सफर करा. पैसे ज्या दिवशी ट्रान्सफर कराल, त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमचा माल येणार. त्या दिवशी माल घ्यायला या. तुमचा व्यवहार चांगला असेल, तर आम्ही त्यावर क्रेडिट देऊ. ५० हजार ते १ लाखापर्यंत माल घेतलात, तर १० ते २० हजार कन्सेशन देऊ.
प्रतिनिधी : तुझ्या मालकासोबत भेट होऊ शकते का?
विक्रेता : अहो मी आहे ना. आमच्या शेठकडून सर्व मुंबईत माल जातो. तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही फक्त व्यवहार चांगला ठेवा.
प्रतिनिधी : बॅ्रण्डेट प्रोडक्ट कुठून येतात? पोलीस अडवत नाहीत का? तुमचा कारखाना कुठे आहे?
विक्रेता : आमचा शेठ इथेच असतो. ही मुंबई आहे, इथे सगळे विकले जाते. कारखाने मुंबईजवळच पण बाहेर आहेत. विरारच्या पुढे आहेत. ‘वहाँ कोई नहीं देखता, वहाँ सब चलता है’, त्यामुळे माल तिथेच तयार होतो. पण, मुंबईत विक्री होते. यहाँ सब चलता है.
प्रतिनिधी : ठीक आहे. मग आम्ही कळवतो.
> प्रतिनिधी : अरे ब्रॅण्डेड प्रोडक्ट दाखवशील? आम्हाला जास्त पीस घ्यायचे आहेत.
विक्रेता : ताई, किती घ्यायचे आहेत. दुकान काढताय का? की कुणाला विकायचे आहेत?
प्रतिनिधी : विकायचे आहेत. त्यामुळे होलसेल रेटमध्ये सांग. परवडले तरच घेऊ.
विक्रेता : होय. आमच्याकडे अन्य मार्केटच्या तुलनेत कमी किमतीत माल मिळतो. तोही बॅ्रण्डेड कंपनीचा आहे. ५०० रुपयांचे कॉम्पॅक्ट १५०मध्ये मिळेल. तुम्ही फक्त सांगा किती पाहिजेत?
प्रतिनिधी : ही प्रोडक्ट ओरिजनल आहेत ना? तुम्हाला कुठून व कशी मिळतात?
विक्रेता : आमच्या शेठचा माल आहे. हा सारा माल गोदीतून मिळतो. मॅडम तुम्ही एवढे का विचारता? तुम्ही कंपनीचे तर नाही ना?
प्रतिनिधी : नाही.. नाही.. पण का रे, असं का विचारलंस? पोलीसही असू शकतो.
विक्रेता : पोलीस नाही इतकी चौकशी करत. तुम्ही चौकशी करत आहात आणि किमतीपण विचारत आहात, त्यामुळे विचारतोय. काहीवेळा कंपनीवाले येतात. त्यांना कळले इतक्या कमी किमतीत माल विकतात, तर वाट लागेल. मग, आम्ही बाराच्या भावात जाऊ. पोलिसांनी पकडलं तर काय सोडवता येतो. पण कंपनीवाल्यांनी तक्रार केली तर काय करणार?
प्रतिनिधी : अरे एवढी भीती कशाला? आम्हाला खरंच विरारमध्ये एकाला माल विकायचा आहे. त्यामुळे माहिती घेत आहोत.
विक्रेता : ओके. ठीक आहे. किती आणि कुठल्या कंपनीचा माल पाहिजे सांगा. आम्ही एका दिवसात सोय करू. पण जास्त ठिकाणी फिरू नका ते तुम्हाला फसवतील. आमच्याकडे चांगला माल मिळेल. गोदीतून येत असल्यामुळे माल कमी किमतीला विकता येतो. पण, कंपनीवाल्यांना ते चालत नाही ना...
प्रतिनिधी : कळवतो.

Web Title: 'Saundariya' black market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.