लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अंगडिया वसुली प्रकरणात पसार पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठींच्या घरी काम करणारा नोकर पप्पूकुमार प्यारेलाल गौड (वय २७) हा तपासाला सहकार्य करत नसल्याचे गुन्हे शाखेने न्यायालयात सांगितले. तसेच त्याच्याकडील मोबाइलचेही गूढ कायम आहे; तर सोमवारी न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
डिसेंबरमध्ये पोलिसांनी अंगडियांकडून बेकायदा वसुली केलेल्या रकमेतील १९ लाख रुपये त्रिपाठींच्या जवळच्या व्यक्ती असलेल्या गौड याला हवालामार्फत पाठविले. अटकेतील पोलीस निरीक्षक ओम वंगाटेने ही रक्कम पाठविल्याची कबुली दिली होती. तसेच, याची एक पावती गुन्हे शाखेला सापडली. त्याआधारे गुन्हे शाखेने गौड याचा शोध घेत उत्तरप्रदेशातून अटक केली. त्रिपाठींच्या सांगण्यावरुन आपण १९ लाख स्वीकारल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. अंगडियाकडून वसूल केलेल्या पैशांपैकी त्रिपाठी यांना हवालामार्फत १९ लाख पाठवल्याचा आरोप आहे. गौड हा २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत होता, तर दुसरीकडे गौडा याच्या मोबाइलचाही अद्याप शोध लागलेला नसून, पोलीस अधिक तपास करत आहेत. या मोबाइलमधून त्रिपाठीसंदर्भात महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे.