मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना, अपघात, अग्नी, घातपात, बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी हल्ला अशा दुर्घटनांबरोबरच, भूकंप, वादळ, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींसाठी, तसेच गणेशमूर्तीवरील आभूषणे, बाप्पाच्या प्रसादातून भाविकांना विषबाधा, दानपेटीतील रक्कम, मंडपातून बँकेपर्यंत जाणारी रक्कम आदी जोखमीबद्दलही मंडळांना विमाकवच मिळणार आहे. एवढेच नव्हे, तर आता कार्यकर्त्यांनाही ५० हजार ते एक लाख रुपयांपर्यंतच्या अपघाती विम्याचे छत्रही मिळणार आहे. त्यामुळे मंडळांनी विमा काढावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.अवघ्या तीन हजार रुपयांच्या एकरकमी हप्त्यात ५६ लाख रुपयांपर्यंत आणि पावणेतीन लाख रुपयांच्या प्रीमियममध्ये दोन कोटी रुपयांपर्यंतचा विमा पुरविणारी ही योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील गणेशोत्सव मंडळांसाठी आहे. जोखमीच्या सहा घटकांसाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या एकरकमी हप्त्यात प्रत्येकी एक लाख रुपयांपर्यंतचे विमाकवच मिळणार असून, पावणेतीन लाख रुपयांच्या हप्त्यात तब्बल दोन कोटी रुपयांपर्यंतचा विमा उपलब्ध केला आहे. पूर्वी गणेशोत्सव मंडळांना दागिने, आग आणि अपघात आदी कारणांसाठी वेगवेगळा विमा काढावा लागत असे. मात्र, आता विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आता अवघ्या तीन हजार रुपयांमध्ये गणपती आणि गणेशोत्सवासाठीच्या सर्व गोष्टींचा एकत्रित विमा काढता येणार आहे. सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांना दुर्घटना किंवा आपत्तीचा धोका असतो. गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आणि देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत असल्याने, अनुचित घटना घडल्यास जीवितहानी आणि वित्तहानीचा धोका वाढतो. अशा प्रसंगी आर्थिक योजनेचा अधिकाधिक मंडळांनी भरपाईच्या माध्यमातून आधार द्यावा, या हेतूने केंद्र सरकारच्या अखत्यारितील योजना सुरू केली. ही योजना केवळ नोंदणीकृत मंडळांसाठी उपलब्ध असून, विम्याचे क्षेत्र मुख्य प्रवेशद्वारापासून गणेश मंडपापर्यंत मर्यादित राहील. योजनेचा लाभ घेण्यासाठी मंडळांनी विम्याचा अर्ज, विम्याच्या विविध घटकांमधील विमा रक्कम, विमा हप्त्याचा धनादेश आणि मंडळाचे नोंदणीपत्र या गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे, तसेच विम्याअंतर्गत दावा करण्यासाठी पोलीस अहवाल महत्त्वाचा असेल. गेल्या वर्षी गिरगाव, खेतवाडी, विलेपार्ले, बोरीवली आणि भार्इंदर येथील ८० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी काढला होता़
सुरक्षेसाठी यंदा तरी विमा काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 1:21 AM