सवरा, धनारे, कठोळे यांचे ‘वस्त्रहरण’, भाजपाला वेठीस धरणे भोवल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 07:11 AM2018-05-09T07:11:22+5:302018-05-09T10:20:05+5:30

श्रीनिवास वनगा यांनी अखेर शिवसेनेचे उमेदवार म्हणून पालघर लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी प्रचंड शक्तिप्रदर्शन करून मंगळवारी अर्ज भरला. त्यापाठोपाठ काँग्रेसच्या राजेंद्र गावितांना गळाला लावून भाजपाने उष्ट्या पत्रावळी चाटण्यात आपणही मागे नाही, हे सिद्ध केले.

Savar, Dhanare, Hardole's 'Wardhaarana', Bhola, Bhola on the other | सवरा, धनारे, कठोळे यांचे ‘वस्त्रहरण’, भाजपाला वेठीस धरणे भोवल

सवरा, धनारे, कठोळे यांचे ‘वस्त्रहरण’, भाजपाला वेठीस धरणे भोवल

Next

- नंदकुमार टेणी
पालघर : श्रीनिवास वनगा यांनी अखेर शिवसेनेचे उमेदवार म्हणून पालघर लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी प्रचंड शक्तिप्रदर्शन करून मंगळवारी अर्ज भरला. त्यापाठोपाठ काँग्रेसच्या राजेंद्र गावितांना गळाला लावून भाजपाने उष्ट्या पत्रावळी चाटण्यात आपणही मागे नाही, हे सिद्ध केले. श्रीनिवास यांच्या शिवसेना प्रवेशाने पालघर जिल्ह्यातील भाजपा आपल्या तालावर नाचविणाऱ्या विष्णू सवरा, पास्कल धनारे, बाबजी कठोळे या त्रिमूर्तींचे मात्र पार वस्त्रहरण झाल्याची चर्चा संपूर्ण पालघर जिल्ह्यात रंगली आहे.
पालघर जिल्ह्यातील भाजपात आपल्या शिवाय एकही नेता निर्माण होऊ नये, असाच प्रयत्न सवरांनी केला. जे नेतृत्व वनगांच्या रूपाने खासदारकी भूषवित होते. त्याची त्यांनी त्यांच्या हयातीतही उपेक्षा केली. त्यामुळे गेल्या दोन दशकांत सवरा एके सवरा अशीच भाजपाची अवस्था पालघरमध्ये राहिली. वनगा यांना खासदारकी मिळाली, तरी संघटनेत अथवा अन्य कार्यात त्यांना फारसे महत्त्व मिळणार नाही, असेच प्रयत्न सवरा यांनी केले. वनगा यांचे निधन झाल्यावर, तर या त्रिकुटाला मोकळे रानच मिळाले होते. भाजपामधील अनेक नेते खासगीत सांगायचे की, मंत्री हेच आमदार हेच, कंत्राटदार यांचेच, अधिकारी यांचेच, सारेकाही खाणार हेच, मग आम्ही करायचे काय? आम्ही काय भजन करण्यासाठी भाजपामध्ये आलो काय? काँग्रेसमध्ये जसे त्या-त्या पातळीवरील कार्यकर्त्यांना सत्तेत आणि संघटनेत, तसेच ठेके वा तत्सम अर्थकारणात प्रयत्नपूर्वक वाटा दिला जातो. तसे पालघर जिल्ह्यात या त्रिकुटाने कधी घडू दिले नाही. त्यांच्याच खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार, परंतु त्याबद्दल मौन आणि कारवाई न करणे हाच त्यांचा पवित्रा कायम राहिला, कारण कर्तेकरविते तेच होते. त्याचाच फटका श्रीनिवास वनगा यांच्या सोडचिठ्ठीच्या रुपाने मिळाल्याचे चर्चा मतदारांत सुरू आहे.
आपल्यापेक्षा खुजांना संधी देण्याच्या सवरांच्या धोरणामुळे धनारेंना डहाणूतून उमेदवारी मिळाली, तसेच जिल्हाध्यक्षपदही सवरांनी मिळवून दिले. कठोळेंना राज्यस्तरीय पद मिळवून देण्यामागे सवराच होते. यामुळे सवरा, धनारे, कठोळे या तिघांविरोधात भाजपात प्रचंड असंतोष खदखदतो आहे. याचे प्रत्यंतर वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सवरा यांची कन्या निशा हिचा पराभव घडवून व निवडणुकीत भाजपाला विरोधी पक्षात बसवून मतदारांनी आणून दिला आहे. विक्रमगड या सवरांच्या मतदारसंघातील नगरपंचायतीतील सत्ता नीलेश सांबरे या तरुण नेत्याच्या नेतृत्वाखाली विकास आघाडीकडे सोपवून, मतदाराने सवरांना आणि भाजपाला धडा शिकविला आहे, तरी भाजपा जागे होण्यास तयार नाही.
पालघर जिल्ह्यात अलीकडे झालेल्या नगरपालिका व पंचायतींच्या निवडणुकीत भाजपाला फक्त डहाणू नगरपरिषदेत विजय मिळाला. तोदेखील काँग्रेसमधून आयात केलेल्या भरत रजपूत या स्थानिक नेत्याच्या प्रभावामुळे. अन्यथा तिथेही भाजपाचा पराभव ठरलेला होता. सवरा हे ज्या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री त्या जिल्ह्यातील एकही निवडणूक ते जिंकू शकले नाहीत. ही एकच बाब त्यांना मंत्रिपदावरून घालविण्यास पुरेशी ठरणारी होती, परंतु भाजपाने त्यांच्याबाबत आणि पालघरमधील अपयशाबाबत धृतराष्टÑ होण्याचे ठरविले त्याला कोण काय करणार?
सवरा आणि कठोळे यांचा वनगाद्वेष वनगांच्या निधनानंतरही संपला नाही. त्यांची शोकसभा टोलेजंग स्वरूपात घेण्याचे ठरले होते. ती यशस्वी करण्याची जबाबदारी सवरांनी घेतली नाही. ती त्यांनी टाकली कठोळेंच्या खांद्यावरती व त्यांनी या सभेच्या तयारीची बैठक संपताच आपल्याच पक्षातील नेत्यांना दूरध्वनी केले की, कुणीही वाहनातून कार्यकर्त्यांना आणू नये, कुणाल्याही भाड्याचे अथवा नाश्त्याचे पैसे दिले जाणार नाहीत. हे पैसे मला पक्ष देणार नाही आणि ते खिशातून खर्च करण्याची माझी ऐपत नाही. त्यामुळे वनगा कुटुंबीय नाराज झाले होते. आणि तेव्हापासूनच वनगा कुटुंबीय भाजपापासून दुर होत गेले.
जर पालघरची पोटनिवडणूक घोषित झाली, तर सहानुभूती फॅक्टर एन्कॅश करण्यासाठी श्रीनिवास वनगा यांनाच उमेदवारी देण्याचा तत्त्वत: निर्णय भाजपाश्रेष्ठींनी घेतला होता. त्या दृष्टीकोनातून भाजपाच्या प्रत्येक महत्त्वपूर्ण कार्यक्रमात श्रीनिवास यांना सन्मानाने व्यासपीठावर विराजमान करावे, त्यांना जास्तीतजास्त एक्स्पोजर द्यावे हे ठरले होते, परंतु सवरा, धनारे, कठोळे यांच्या पचनी ही बाब पडली नाही, त्यामुळे श्रीनिवास यांना कार्यक्रमाला बोलवायचे, परंतु महत्त्व द्यायचे नाही. तुच्छतेने वागवायचे, त्यांची दखल घ्यायची नाही, असे हीन राजकारण या त्रिकुटाने केले. जे श्रीनिवास प्रथमच सार्वजनिक जीवनात प्रवेशकर्ते झाले होते. त्यांना आधार आणि मार्गदर्शनाची आवश्यकता होती. ते देण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण या तिकडमने केले. त्याचा परिणाम त्यांनी शिवबंधन बांधून घेण्यात झाला.

...अन् भाजपाच्या विरोधाची ठिणगी पडली

विष्णू सवरा, पास्कल धनारे, बाबजी कठोळे या त्रिकुटाने गेल्या चार वर्षांत एवढी माया जमविली आहे की, एका शोकसभेसाठी दोन-चार लाख खर्च करणे म्हणजे त्यांच्यासाठी चिल्लर बाब ठरावी, परंतु वनगाद्वेषाच्या भुताने त्यांना पछाडले होते. त्यांच्या मृत्यूनंतरही हे भूत त्यांचा पिच्छा सोडण्यास तयार नव्हते. वनगा परिवाराच्या मनात भाजपाच्या विरोधाची ठिणगी सर्वप्रथम तिथे पडली. नंतर घडलेल्या घटनांतून तिचे रूपांतर वणव्यात होत गेले.

Web Title: Savar, Dhanare, Hardole's 'Wardhaarana', Bhola, Bhola on the other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.