Join us

महाराष्ट्रात काढणार सावरकर गौरव यात्रा; एकनाथ शिंदेंची घोषणा, उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 6:51 AM

राहुल गांधींवर केली टीका

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अवमान करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध करण्यासाठी आणि सावरकरांचे कार्य पुन्हा एकदा जनतेसमोर आणण्यासाठी भाजप-शिवसेना (शिंदे गट) महाराष्ट्रात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. 

राहुल गांधींनी सावरकरांच्या केलेल्या अपमानामुळे राज्यातील जनतेमध्ये असंतोष, चीड आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढून सावरकरांच्या त्यागाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ही गौरव यात्रा काढून भाजप-शिवसेनेकडून (शिंदे गट) उद्धव ठाकरेंची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

उद्धव ठाकरे मारणार का जोडे?

काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांचा अवमान केला तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना जोडे मारले होते. आता उद्धव ठाकरे राहुल गांधींना जोडे मारण्याची हिंमत दाखवणार का?बाळासाहेब असते तर त्यांनी राहुल गांधींना जोडे मारले असते आणि सावरकरांचा अपमान निमूटपणे सहन करणाऱ्यांनाही जोडे मारले असते. मालेगावच्या जाहीर सभेत सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही असे ठाकरे म्हणाले, अपमान सहन करणार नाही म्हणजे काय करणार, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता केला.

फडणवीस यांची टीका 

सत्तेला लाथ मारायची हिंमत नाही, त्यामुळे त्यांच्या भाषणात सावरकर जिवंत राहतील, कृतीत सावरकर राहणार नाहीत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

प्रोफाइल फोटोच्या जागी सावरकरांचा फोटो 

सावरकर गौरव यात्रेची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरील प्रोफाइल फोटोच्या जागी सावरकरांचा फोटो लावला आहे. या फोटोवर आम्ही सारे सावरकर असा मजकूर लिहिण्यात आला आहे.

यात्रा काढण्यापूर्वी ‘सहा सोनेरी पाने’  वाचावे - काँग्रेस

एकनाथ शिंदेंनी सावरकर गौरव यात्रा काढण्यापूर्वी सावरकरांचे ‘सहा सोनेरी पाने’ पुस्तक वाचावे. यात सावरकर शिवरायांबद्दल म्हणतात, ‘काकतालीय नितीप्रमाणे (कावळा बसायला आणि फांदी तुटायला याप्रमाणे) शिवाजी राजा झाला. नायतर त्याची योग्यता नव्हती’. तसेच छत्रपती संभाजी राजांबद्दल ‘हिंदुपद पातशाही’ या पुस्तकात सावरकर लिहितात की, ‘मदिरा आणि मदिराक्षीत कैकाड बुडालेला नादान नाकर्ता राजपुत्र संभाजी’. सावरकरांची छत्रपतींबद्दलची ही विधाने शिंदेंना मान्य आहेत का? हे त्यांनी यात्रेआधी जाहीर करावे. - अतुल लोंढे, मुख्य प्रवक्ते, काँग्रेस 

टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र सरकारकाँग्रेसउद्धव ठाकरे