मुंबई - स्वातंत्र्य चळवळीत विनायक सावरकरांचा वाटा असता तर इंग्रजांकडून त्यांना महिन्याला ६० रुपये मिळाले नसते. भाजपा याचं उत्तर का देत नाही. सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अडीच जिल्ह्याचे राजे म्हटलं होते. छत्रपतींवर अशाप्रकारे टीका करणाऱ्या सावरकरांनी तरुणांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सैन्यात जाऊ नका असं म्हटलं होतं. त्या सावरकरांसाठी भाजपाला आंदोलन करण्याची गरज काय? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
नाना पटोले म्हणाले की, इंग्रजांचे हस्तक असलेले आणि ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय त्यांचा सन्मान भाजपा करायला निघाले आहेत. राहुल गांधी काय चुकीचे बोलले? या देशाला काँग्रेसनं स्वातंत्र्य मिळवून दिले. अनेक काँग्रेसजनांनी बलिदान दिले. आज हा देश वाचवणं ही जबाबदारीही काँग्रेसची आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला लोकांचा प्रतिसाद मिळतोय. हे जन आंदोलन होतंय त्यामुळे भाजपाच्या पायाखालची जमीन सरकत आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच सावरकरांसारख्या व्यक्तींचा उल्लेख करून राहुल गांधींना बदनाम करणे हे जास्त काळ चालणार नाही. महिन्याला ६० रुपये कशाला मिळत होते. देशाच्या विरोधात असणाऱ्या सावरकरांचा सन्मान भाजपा करतेय. सत्तेचा दुरुपयोग करून देश भाजपा विकतेय. भाजपाला देशाचं स्वातंत्र्य नको. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले संविधानही नको. सावरकरांचे समर्थन करून भाजपा देशद्रोह करतेय अशी घणाघाती टीका नाना पटोलेंनी भाजपावर केली आहे.
उद्धव ठाकरे गटानं केला होता निषेधराहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाचा निषेध करत उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते मनिषा कायंदे म्हणाल्या होत्या की, राहुल गांधींनी सावरकरांविरोधात बोलण्यापूर्वी विचार करावा. त्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो आणि शिवसेनेचे सावरकरांबाबत तेच मत आहे, ते कधीही बदलणार नाही असं त्यांनी सांगितले. सावरकरांनी स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांसाठी काम केले आणि त्याचा मोबदला त्यांना मिळाला, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती, तसेच त्यांनी टीका करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ब्रिटिश राजवटीला पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"