मुंबई - खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या बोरीवली येथील स्वा. सावरकर उद्यान येथे स्वा. सावरकर जयंतीनिमित्त महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम तीन दिवस चालणार असून त्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यामुळे या सर्व कार्यक्रमांचा सावरकरप्रेमींनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. लोकमत या कार्यक्रमांचे माध्यम प्रायोजक आहे. बोरीवलीच्या स्वा.सावरकर उद्यानामार्फत हा कार्यक्रम साजरा करण्याचे हे बारावे वर्ष आहे. त्यानिमित्त शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत २६ ते २८ मे या कालावधीत हा सोहळा रंगणार आहे. या दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. शनिवार, २६ मे रोजी द़ोन गटात वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात सावरकरांच्या कवितांचे वैविध्य, सावरकरांचा विज्ञान दृष्टिकोन, सावरकरांची भाषाशुध्दी, त्यागमूर्ती सावरकर, टिळक आणि सावरकर या विषयांचा समावेश आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. रविवार, २७ मे रोजी ‘मानवी कासुंबीनो रंग डायरो गुजराथी’ हा लोकसंगीताचा कार्यक्रम रंगणार आहे. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सोमवार, २८ मे रोजी ‘अथांग सावरकर’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमात शरद पोंक्षे,अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, रविराज पराडकर, हेमंत बर्वे, सुचित्रा भागवत, नंदेश उमप आणि श्रीरंग भावे यांचा सहभाग असेल. त्यामुळे हे तिन्ही दिवस रंगणाºया या भरगच्च कार्यक्रमांना सावरकर प्रेमींनी आवर्जून उपस्थित द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.