मुंबई : काँग्रेसच्या राष्ट्रभक्तीला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचे फटकारत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी काँग्रेस सावरकरविरोधी नसल्याचे स्पष्टीकरण गुरुवारी दिले. काश्मीरविषयक ३७० कलम हे तात्पुरते असल्याचे आम्हालाही माहीत होते आणि ते हटविणे आवश्यकही होते. मात्र सध्याच्या सरकारने त्यासाठी ज्या मार्गाचा अवलंब केला त्याला आमचा विरोध आहे, असे ते पत्रकार परिषदेत म्हणाले.
काँग्रेस नेत्यांकडून वीर सावरकर व कलम ३७० हटविण्याच्या विरोधात वक्तव्ये केली जात असताना डॉ. सिंग यांनी वेगळी भूमिका मांडली. ते म्हणाले, काँग्रेस पक्ष सावरकरविरोधी नाही. इंदिरा गांधी यांनी सावरकरांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट काढले होते. मात्र सावरकरांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला आमचा विरोध होता व आहे.
कलम ३७० बाबत भाजपकडून काँग्रेसवर होणाऱ्या टीकेविषयी ते म्हणाले, काँग्रेसने कलम ३७० हटविण्यास विरोध केलेला नाही. ज्या मनमानी पद्धतीने भाजप सरकारने हे कलम हटविले त्याला आम्ही विरोध केला. असे निर्णय घेताना स्थानिकांना विश्वासात घ्यायला हवे होते. आता जम्मू-काश्मीरच्या नागरिकांच्या सुखसोयींसाठी केंद्र सरकारने प्रयत्न करायला हवेत. काँग्रेसला कोणी देशभक्ती शिकवू नये. काँग्रेसपेक्षा जास्त देशभक्त कोणत्याच पक्षाने दिले नाहीत. स्वातंत्र्यलढ्यात भाजप व संघाचे नावही नव्हते, असा टोला मनमोहन सिंग यांनी भाजपला लगावला.
ते पुढे म्हणाले, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आर्थिक मंदी आल्याने चीनकडून होणारी आयात १ लाख २२ हजार कोटी रुपयांनी वाढली आहे.विकासाचे मॉडेल अपयश मोठा गाजावाजा करत आणलेले भाजपचे विकासाचे मॉडेल महाराष्ट्रात सपशेल अपयशी ठरले आहे. एकेकाळी गुंतवणूक आकर्षित करण्यात पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आजघडीला देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होणारे राज्य झाले आहे, अशी टीकाही मनमोहन सिंग यांनी केली.
‘सरकारने स्वत:च्या चुका शोधाव्यात’
विकास दरात सातत्याने घट होत आहे. यासाठी आधीच्या काँग्रेस सरकारला जबाबदार धरणे चुकीचे आहे. तुम्हाला सत्तेत येऊन पाच वर्षांहून अधिक काळ झाला. मागच्या सरकारला जबाबदार धरण्यापेक्षा यूपीएच्या चुका शोधून त्यात सुधारणा करायला हव्या होत्या, असेही मनमोहन सिंग यांनी सुनावले.ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्याचे आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिले आहे. पण, भारतरत्न देण्यासाठी एक समिती नेमली जाते आणि ती समिती भारतरत्न कुणाला द्यायचे याचा निर्णय घेते.