"सावरकरांना भारतरत्न न दिल्याने विषाद वाटतो", सावरकर गौरव पुरस्कार अरुण जोशी यांना प्रदान
By स्नेहा मोरे | Published: February 28, 2024 08:10 PM2024-02-28T20:10:55+5:302024-02-28T20:13:10+5:30
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे दरवर्षी दिला जाणारा स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्कार यंदा जेष्ठ सावरकर भक्त अरुण जोशी यांना प्रदान करण्यात आला.
मुंबई- सावरकर जातपात न मानणारे होते. तरीही त्यांना जातीयवादी ठरवले जाते. सावरकरांना सापत्नभाव का, असा सवालही ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉ. वि.स. जोग यांनी केला. आज सावरकरांना भारतरत्न जाहीर व्हायला हवे होते. इतरांना दिले त्याचे समाधान आहेच. मात्र, सावरकरांना न दिल्याने विषाद वाटतो, यापुढे मी व समितीलाही सावरकरांना भारतरत्न द्या, अशी भिक्षा मागू देणार नाही, असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉ. वि. स. जोग यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे दरवर्षी दिला जाणारा स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्कार यंदा जेष्ठ सावरकर भक्त अरुण जोशी यांना प्रदान करण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे व डॉ. वि.स. जोग यांच्या हस्ते अरुण जोशी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह, ११ हजार रोख व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून जेष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉ. वि. स. जोग, तसेच समितीचे कार्याध्यक्ष शिरीष दामले, मिलिंद कानडे महासचिव अनिल देव व्यासपीठावर उपस्थित होते.
हेमंत धर्माधिकारी यांनी गीत सादर केले. मानपत्राचे वाचन श्याम देशपांडे यांनी केले. सावरकर विचार मंचतर्फे वीरेंद्र देशपांडे, हिंदू महासभेतर्फे पद्मश्री तांबेकर, सावरकर विद्या भवनतर्फे कल्पना जोग तसेच शांतीनिकेतन कनिष्ठ महाविद्यालय, अरुण जोशी शिक्षण महाविद्यालयातर्फेही सत्कार करण्यात आला. सावरकरांनी भाषाशुद्धी व लिपीशुद्धीसाठी चळवळ केली. देशाला सावरकरांच्या विचारांची गरज आहे. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर देशभक्त, थोर क्रांतिकारक होते, असे डॉ संजय दुधे म्हणाले. अरुण जोशी यांनी हा सन्मान म्हणजे सावरकर विचारांना अधिकाधिक देशभक्तांपर्यंत पोहचविण्याचा केलेला प्रयत्न असून यापुढील काळातदेखील हे कार्य अविरतपणे सुरुच राहिल, असे सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले.