मंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंद गटातर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधून आजपासून या यात्रेला प्रारंभ होणा असून नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्याचं काम या यात्रेतून करण्यात येईल. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज वज्रमूठ सभाही संभाजीनगर येथे होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला. सावरकर गौरव यात्रेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोलाही लगावला.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला आहे. मिंधे गटाला सावरकरांबद्दल काय माहिती आहे, त्यांच्या साहित्याबद्दल काय माहिती आहे. सावरकरांचा विचार आणि हिंदुत्त्व काय माहिती आहे, असे म्हणत शिंदे गटाला लक्ष्य केले. तसेच, सावरकर हे दाढीविरोधी होते, त्यांचे फोटो पाहा, कुठल्याही फोटोत ते दाढी वाढवलेले दिसणार नाहीत. मग, सावरकर गौरव यात्रा काढणाऱ्यांना हे जमणार आहे का? एकनाथ शिंदे दाढी कापून फिरतील का?, असा सवाल शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. सावरकरांनी सांगितलं होतं की दाढी वगैरे वाढवणं आपल्या धर्मात बसत नाही. मग कुणीही असो. मग आता डॉ. मिंधे सावरकरांच्या यात्रेत गुळगुळीत दाढी करून फिरणार आहेत का? एकनाथ शिंदेंनी सगळ्यात आधी आपली दाढी काढली पाहिजे.
सावरकरांचे पारायण करावे
मिंधे गटाने अगोदर सावरकरांचे पारायण करावे. माझी जन्मठेप, सहा सोनेरी पानं, इतर विज्ञानवादी लिखाण या सगळ्या लिखाणाचं डॉ. मिंधे आणि त्यांच्या ४० लोकांनी पारायण करावं आणि मग त्यांच्या विचारांसाठी सावरकर यात्रा काढावी. भाजपालाही सावरकर विचारांचं पारायण करायची गरज आहे. तुम्ही सावरकरवादी असूच शकत नाही”, असेही राऊत यांनी म्हटलंय.
दरम्यान, भाजप आणि शिंदे गटाच्यावतीने आजपासून राज्यात सावरकर गौरव यात्रेला सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजी नगर येथून ह्या यात्रेला सुरुवात करण्यात येत आहे.