Join us

उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्यानं सावरकरांचे नातू रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 11:43 PM

फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई: सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांना माहीम येथील रहेजा फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काँग्रेस सेवादलानं छापलेल्या पुस्तिकेतील वादग्रस्त मजकूराबद्दल आज रणजित सावरकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यानंतर एका वाहिनीवर चर्चासत्रात बोलत असतानाच त्यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काँग्रेस सेवादलाच्या पुस्तिकेत वीर सावरकरांबद्दल वादग्रस्त मजकूर छापण्यात आला आहे. त्यामुळे मोठा वादंग माजला आहे. या पुस्तिकेविरोधात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी नाराजी व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. रणजीत सावरकर यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे भेटण्यासाठी गेले असता त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट होऊ शकली नाही. 

रणजीत सावरकरांनी या पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणी केली आहे. त्याचसोबत या प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर गुन्हा दाखल करावा यासाठी ते आग्रही आहेत. रणजीत सावरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. पण त्यांना उद्धव ठाकरेंची वेळ मिळाली नाही. याबाबत नाराजी व्यक्त करताना रणजीत सावरकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना एक मिनिटही माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नाही. हा सावरकरांचा अनादर आहे. वीर सावरकरांचा हा अपमान आहे, अशा शब्दांत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे शिवसेना सावरकरांचं कौतुक करते तर दुसरीकडे अशाप्रकारची वागणूक दिली जाते. जवळपास ४० मिनिटांहून अधिक काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वाट पाहत मंत्रालयात ताटकळत बसावं लागलं. मुख्यमंत्री कार्यालयाला अनेकदा कळवलं तरी मुख्यमंत्र्यांनी भेटण्याची तसदी घेतली नाही असं सांगत रणजीत सावरकर मुख्यमंत्र्यांना न भेटताच मंत्रालयातून निघून गेले.  

टॅग्स :विनायक दामोदर सावरकरउद्धव ठाकरेशिवसेना