Join us  

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला सावरकरांचे नाव !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 7:37 AM

व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठाच्या गुरुवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत नुकत्याच उद्घाटन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. राज्यपालांनी या वसतिगृहाला सावरकर यांचे नाव देण्याची सूचना उद्घाटनाच्या वेळी केली होती. या सूचनेला अनुमोदन देत व्यवस्थापन परिषद सदस्य नील हेळेकर यांनी व्यवस्थापन परिषदेत हा प्रस्ताव मांडला. याला प्राचार्य भामरे आणि प्राध्यापक गर्जे यांनी अनुमोदन देत हा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेत मंजूर करण्यात आला. एकीकडे युवासेना सदस्यांनी या निर्णयासंदर्भात तटस्थ भूमिका घेतली तर छात्रभारतीने या निर्णयाचा निषेध करीत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

गुरुवारी मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला राजर्षी शाहू महाराजांचे नाव द्यावे, हा प्रस्ताव नाकारला आणि सावरकरांच्या नावाचा ठराव केला. यावर छात्रभारतीने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सावरकर यांचे शैक्षणिक योगदान काय? त्या वेळेसच्या पुरोहितांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना वेदोक्त मंत्र नाकारले, आताही वसतिगृहाला शाहूंचे नाव नाकारले. आजही यांना शाहूंच्या नावाचं वावडं आहे, अशा संतप्त भावना व्यक्त करीत छात्रभारतीने मुंबई विद्यापीठाचा निषेध केला आहे. शाहू महाराजांचा अवमान कदापि सहन करणार नाही. छात्रभारती तीव्र आंदोलन करणार, असा इशारा छात्रभारतीचे राज्य कार्याध्यक्ष रोहित ढाले यांनी दिला आहे. 

 सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांनी विविध वसतिगृहे सुरू केली. परदेशी शिक्षण घेता यावे यासाठी शिष्यवृत्ती दिली. हे वर्ष छत्रपती शाहू महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. शाहू महाराजांचे निधन मुंबईत झाले. मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्यात यावे, ही मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केली होती. दरम्यान, छत्रपती शाहू महाराजांवर विद्यापीठाने अन्याय केला आहे. राज्यपाल, कुलगुरू व व्यवस्थापन परिषदेने या निर्णयाचा पुनर्विचार करावा; अन्यथा छात्रभारती याविरोधात तीव्र आंदोलन करेल, असे ढाले यांनी म्हटले आहे.

टॅग्स :मुंबईमुंबई विद्यापीठ