मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबद्दल फार मोठा पुळका दाखवत भाजपने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात गोंधळ घालत महत्वाचा वेळ वाया घालवला. प्रत्यक्षात मात्र भाजपेतर राजकीय नेत्यांनीच सावरकरांसाठी मोठे योगदान दिले असून भाजपने केवळ राजकीय स्वार्थासाठी सावरकरांच्या नावाचा वापर केला, असा आरोप अंदमानातील महाराष्टÑ मंडळाचे आजीव सदस्य व सल्लागार विष्णू गवळी यांनी केला.
अंदमानातील सावरकर स्मारकाचे भूमीपूजन पहिले पंतप्रधान पंडीत नेहरूनी केले आहे. १९७० साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकरांवरील पहिले टपाल तिकीट जारी केले. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी स्मारकासाठी पाच लाखाचा निधी दिला. माजी मंत्री स्व. पांडुरंग फुंडकर हे अंदमानाला भेट देण्यासाठी आले तेव्हा त्यांच्याकडे आम्ही दोन कोटींचा निधी मागितला. फुंडकर यांनी स्वत: पत्र पाठवून तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. विधान परिषदेतही सूचना मांडली होती. पण फडणवीस यांनी यासाठी एक छदामही दिला नाही. अंदमानला झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनास विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी स्मारकास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार हे संरक्षणमंत्री असताना त्यांनीही सावरकर स्मारकाला भेट दिली होती. मणिशंकर अय्यर यांनी सेल्युलर कारागृहातील सावरकरांच्या स्वतंत्र ज्योतीवरील काव्यपंक्ती हटविल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने देशभर आंदोलन झाले होते, याकडेही गवळी यांनी लक्ष वेधले.