Join us  

शरद पवारांसाठी सावरकरांची कविता; राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी म्हटल्या दोन ओळी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 4:00 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला.

मुंबई - मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये 'लोक माझा सांगती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदावरुन निवृत्ती घेण्याची घोषणा आज केली. त्यानंतर, राष्ट्रवादी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला असून अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत. पवार यांच्या या निर्णयाचा केवळ राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडीवरच नाही, तर देशाच्या राजकारणावर परिणाम होणार आहे. त्यामुळेच, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने व्हिडिओतून पवारांपुढे अपेक्षा व्यक्त केलीय. तर, राष्ट्रवादीचे पदाधिकारी नेते भावूक झाले आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी यावेळी शरद पवारांबद्दल भावना व्यक्त करताना सावरकरांच्या कवितेतील ओळी म्हटल्या. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच, संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यातील सदस्यच निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितलं. पवारांच्या या घोषणेनंतर पक्षाचे अनेक नेते-पदाधिकारी मंचावर गेले आणि शरद पवारांना आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यावेळी अनेक कार्यकर्ते भावूक झाले, काहींना अश्रू अनावर झाले. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी तर पवारांचे पायही धरले. शरद पवार आगे बढो, हम तुम्हारे साथ है, हमारा नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो, अशा घोषणा शेकडो कार्यकर्त्यांकडून यावेळी देण्यात आल्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते जयंत पाटील, अनिल देशमुख, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड यांनी भावनिक भाषण करत शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली. याच दरम्यान, अंकुश काकडे यांनीही आपलं मत व्यक्त केलं. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयोस्तु ते... या देशभक्तीपर कवितेतील काही ओळी आज राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांनी म्हटल्या. मुंबईतील वाय.बी. चव्हाण सभागृहातच शरद पवार यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करताना त्यांनी या पंक्ती म्हटल्या. साहेब, तुजविण जनन ते मरण, तुजसाठिं मरण तें जनन... असे म्हणत शरद पवार यांनी आपला निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, असे अंकुश काकडे यांनी सूचवले. 

दरम्यान, सावरकर यांच्या जयोस्त्तु ते... या कवितेतील जयोस्तु ते श्रीमहन्मंगले। शिवास्पदे शुभदे्! स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे या पंक्ती भारत मातेसाठी त्यांनी रचल्या आहेत. त्यातील दोन पंक्ती म्हणजेच हे जगणं तुझ्यासाठीच आणि हे मरणंही तुझ्यासाठीच असल्याचं काव्यपंक्ती आहेत, ज्या अंकुश काकडे यांनी बोलून दाखवल्या.

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारमुंबई