श्वसनविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 01:13 AM2017-07-31T01:13:40+5:302017-07-31T01:13:40+5:30
पावसाळा आला की आजारांची संख्याही तितक्याच प्रमाणात वाढत चालली आहे. संसर्गजन्य ताप, साधारण सर्दी, मलेरिया, टायफॉईड, अतिसार आदी सामान्य रोगांमुळे लोक त्रस्त होतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पावसाळा आला की आजारांची संख्याही तितक्याच प्रमाणात वाढत चालली आहे. संसर्गजन्य ताप, साधारण सर्दी, मलेरिया, टायफॉईड, अतिसार आदी सामान्य रोगांमुळे लोक त्रस्त होतात. पावसाळ्यातील दमट आणि कुबट हवामानामुळे, घरातल्या कोंदटपणामुळे तसेच, भिंती, घराची लादी तसेच, सोफा कव्हर्समधील बुरशी किंवा तत्सम किटाणूंमुळे श्वसनविकारही वाढत चालले असल्याचे आपल्या लक्षातच येत नाही. पावसाळ्याच्या दिवसांत मुंबई शहर- उपनगरात श्वसनविकाराने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत श्वसनविकारांच्या वाढत्या प्रमाणाबद्दल डॉ. सलिल बेंद्रे म्हणाले की, पावसाळ््याशी संबंधित आजार टाळण्यासाठी योग्य वेळी योग्य ती प्रतिबंधात्मक काळजी घेणे हाच मूळ उपाय आहे. हवेतील प्रदुषणाचा विपरित परिणाम सर्वच वयोगटातील व्यक्तींवर होत असला, तरीही लहान मुलांमध्ये अस्थमा आणि फुफ्फुसाच्या संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. तसेच, वृद्ध व्यक्ती आणि मधुमेहीसुद्धा हवेतील प्रदुषणामुळे फुफ्फुसाच्या संसर्गाचे बळी पडतात. पावसाळ्याच्या दिवसांत घरातील हवा प्रदुषण टाळण्यासाठी सुवासिक उदबत्त्यांचा वापर टाळणे, कार्पेट्स किंवा सोफा कव्हर वेळोवेळी स्वच्छ करणे, वेलवेटच्या वस्तू स्वच्छ ठेवणे, वातानुकुलित यंत्राची वेळोवेळी निगराणी राखणे, हे काही महत्वाचे उपाय आहेत़
असोसिएशन आॅफ हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. पी. एम. भुजंग म्हणाले, तुम्ही पित असलेले पाणी तुम्ही हवे तसे निवडू शकता, परंतु, आपण श्वसनावाटे शरीरात घेत असलेली हवा आपण निवडू शकत नाही. मोठ्या शहरांतील लोकांना बाहेरच्या दुषित हवेमुळे होणाºया दुष्परिणामांची पूर्ण कल्पना असते. परंतु, पावसाळ्यात तर केवळ बाहेरची हवाच नव्हे, तर घरातली किंवा बंद खोलीतली हवाही प्रदुषित असते. कार्यालये, बंद खोल्या या इनडोअर एअर क्वालिटी (आयएक्यू) वर लक्ष पुरवण्याची आवश्यकता आहे. बंद ठिकाणच्या हवेमुळे माणसाच्या श्वसनसंस्थेवरही त्याचे पडसाद दिसू लागतात.