मेहरून नाकाडे ल्ल रत्नागिरी चंद्र - तारे तोडून आणण्याची भाषा करणारे अनेक प्रेमवीर लग्नानंतर बाजारातून भाजी आणायलाही तयार नसतात. लग्नाआधीचं प्रेम लग्नानंतर आटून जाते, असे अनेक ठिकाणी दिसते. पण विभा आणि विनोद ही जोडी मात्र या साऱ्यात थोडी वेगळीच. विभा आणि विनोद कदम. लग्नानंतर दोनच वर्षात विभाला ब्रेन ट्युमर असल्याचे निष्पन्न झाले आणि करियर उभे करण्यासाठीची सर्व उमेद विनोदने आपल्या जोडीदारीण, विभाचे आयुष्य सावरण्याला लावली. गेली सात वर्षे या जोडीने आपल्या आयुष्याची गाडी पुन्हा रूळावर आणली आहे आणि ती गाडी धावतही आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ यापेक्षा वेगळा काय असतो?रत्नागिरीच्या मिऱ्यावरची रश्मी जाधव व पोमेंडीतला विनोद कदम दोघे रत्नागिरीत एकाच क्षेत्रात कार्यरत असताना दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. २00८ साली त्यांनी लग्न केले आणि रश्मीची विभा झाली. विनोद जवळच्या तालुक्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक झाला. दोघांच्या संसारवेलीवर ‘इच्छा’रूपी कन्यारत्न उमलले. अचानक या सुखी संसाराला दृष्ट लागली. २0१0मध्ये एके दिवशी विभा फीट येऊन कोसळली. तातडीने तिला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी विविध तपासण्या केल्यानंतर ब्रेन ट्युमर असल्याचे निदान केले. तातडीने आॅपरेशनचा सल्ला दिला.विनोदच्या पायाखालची वाळू सरकली. सहा महिन्याचे बाळ आणि आॅपरेशनचा लाखोंच्या घरातला खर्च, अशी मोठी अडचण होती. विनोद तिला घेऊन कोल्हापूरला गेला. आॅपरेशन पार पडले. विभा अतिदक्षता विभागातून बाहेर जनरल वॉर्डमध्ये आली. आता सारे काही व्यवस्थित होईल, असे वाटत होते आणि अचानक तिला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. उलट्या थांबत नव्हत्या. विनोद, विभाचे वडील, भाऊ सगळेच हादरले. तीन दिवस तिला उलट्यांचा त्रास सुरू होता, त्यामुळे तिला पुन्हा अतिदक्षता विभागात हलवले.सलग दीड महिना विभा रूग्णालयात होती. ट्युमरचा अहवाल कदम आणि जाधव कुटुंबाला हादरा देणारा ठरला. विभाला ‘कोरिओ कॉर्सोनोमा’ असल्याचे निदान झाले. विनोदने विभाला सावरत थेट ‘टाटा रूग्णालय’ गाठले. गर्भपिशवी, फुफ्फुस, मेंदूमध्ये कॅन्सरची लागण झाली होती. तीन विविध डॉक्टरांकडून तपासणी करावी लागली. प्रत्येकाची मते वेगळी होती. तुमची पत्नी जेमतेम एक ते दीड महिना जगेल, तिला घरी घेऊन जा, असाही सल्ला फुफ्फुसतज्ज्ञांनी दिला होता. मात्र, विनोद डगमगला नाही. अखेर डॉक्टरांनी उपचारांती विभाला आठ केमो (केमोथेरपी) द्यावे लागतील, असे सांगितले. पुढील उपचारांसाठी दोन ते अडीच लाख खर्च येईल, असे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले. गाठीशी होते तेवढे पैसे संपले होते. आता पुढे काय, हा प्रश्न होताच. सुदैवाने उपचारासाठी शासकीय योजनेतून पैसे मिळाले.डोक्यावर केस नसताना, उपचारांमुळे प्रकृती साथ देत नसतानाही विभा पहिल्या नोकरीच्या ठिकाणी गेली. तुला जमणार असेल तर कर, असे सांगून त्यांनी विभाला संधी दिली. दरम्यान, विनोदला नोकरीवर पाणी सोडावे लागले. खरे तर ते वय विनोदच्या करियर उभारणीचा महत्त्वाचा टप्पा होते. पण, त्यानं विभाचं आयुष्य सावरण्याकडेच पूर्ण लक्ष दिले. पुढे गरज म्हणून एमएबीएड झालेला विनोद कसलाही किंतू मनात न बाळगता सलग दोन वर्षे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. विभा-विनोदची परीक्षा तरीही संपली नव्हती. एका सहकाऱ्याने केलेल्या चुकीची किंमत विनोदला स्वत:च्या नोकरीवर मोजावी लागली.आता नोकरी नाही, व्यवसाय करायचा, असे या दोघांनी ठरविले आणि त्यासाठी विभाने स्त्रीधन म्हणून असलेले दागिने विनोदच्या हातात दिले. संगणक, प्रिंटर व दोन शिलाई मशीन विकत घेतल्या. विभाने शिवणकाम सुरू केले. विनोदने संगणकाव्दारे आॅनलाईन अर्ज भरणे, फोटो, पॅनकार्डची कामे सुरू केली. वेळ मिळेल तसे विनोदही शिवणकाम करत असे. उच्च शिक्षण असूनही शिवणकाम करतो, म्हणून अनेकांनी नाके मुरडली. परंतु दोघंही आपल्या मतावर ठाम होती. आजारपणात विभाने मुंबईत नऊवारी तयार साडी शिवण्याची कला आत्मसात केली. नऊवारी साडी शिवून मिळेल, असा बोर्ड लावला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.आतापर्यंत भाड्याच्या गाळ्यात व्यवसाय करणाऱ्या विभा व विनोद ‘व्हॅलेंटाईन डे’ला स्वत:च्या गाळ्यात शिफ्ट होणार आहेत. चित्रपटाची कथा असावी, असे या दोघांचे आयुष्य आता सुखमय वळणावर आले आहे. कुठल्याही परिस्थितीत जोडीदाराची साथ न सोडणाऱ्या या जोडप्याइतकं ‘व्हॅलेंटाईन’चे दुसरे उदाहरण मिळणे थोडे अवघडच.बाळाला सांभाळले आजी-आजोबांनीविभा व विनोदचे बाळ ‘इच्छा’ अवघी सहा महिन्यांची असताना उपचारासाठी बाहेर पडावे लागले. वर्षभर तरी विविध उपचारासाठी विभा व विनोदला घराबाहेर राहावे लागले. सासू-सासऱ्यांनी पाठिशी उभे राहून साथ दिली, बाळाला सांभाळले. मुलगी लहान असल्यामुळे अनेकांनी विनोदला दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. मात्र, विनोदने इन्कार करून विभाला सावरले. विनोदच्या निर्णयाला आई-वडिलांनीही पाठिंबा दिला.चित्रातील रंगांनी दिली साथकेमो सुरू असताना मुंबईत उष्म्याचा प्रचंड त्रास होत असे. झोपूनदेखील सारखा लेकीचा विचार सतावत असे. पतीच्या चेहऱ्याकडे पाहून सर्व विसरत असले तरी आतून पोखरत होते. पतीच्या नजरेतून सुटले नाही. त्यांनी रंग, ब्रश, कॅन्व्हास आणून दिला. उपचारादरम्यान वेदना विसरण्यासाठी काही पेंटिंग्ज करण्यास प्रारंभ केला. विभाची चित्रकला उत्कृष्ट असल्याने त्यांना अमेरिका, लंडन येथून मागणी होते.त्यांच्या कृतीने दिला धीररत्नागिरीतील मोरेश्वर जोशी यांनी आकाशवाणीतील कर्मचारी तसेच दानशूर मंडळींकडून मदत घेऊन विनोदच्या हाती काही रक्कम दिली.कर्करोगातच भोगले आंधळेपणपहिली केमो व्यवस्थित झाली. पण, दुसऱ्या केमोनंतर डोळ्यांना प्रचंड सूज आली. एक महिना काहीच दिसत नव्हते. मला माझ्या तान्हुलीला पाहता तरी येईल की नाही, हा प्रश्न विभाला व्याकुळ करीत होता. आंधळेपण काय असते, हेही विभाने कॅन्सरच्या आजारातच एक महिनाभर भोगले.लेकीचा पहिला वाढदिवसतीन केमो झाल्यानंतर मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला विभा आणि विनोद घरी आले. डॉक्टरांचा स्पष्ट नकार असतानादेखील फक्त पोटच्या लेकीसाठी घर गाठले. लेकीला मिठी मारली तेव्हा ती माऊली सर्व यातना विसरली.
‘सत्यवाना’च्या धडपडीने, प्रबळ इच्छाशक्तीने परत आणले ‘सावित्री’चे प्राण
By admin | Published: February 13, 2017 10:59 PM