मुंबई : शिवसेनेची सत्ता आल्यावर ‘आरे हे जंगल घोषित करू,’ असे आश्वासन नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या प्रचारात दिले होते. शिवसेनेची सत्ता आली असून मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा आरेचा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी शिवतीर्थावर पर्यावरणप्रेमींनी हजेरी लावली. या वेळी पर्यावरणप्रेमींनी हातात ‘सेव्ह आरे’चा हिरव्या रंगाचा बॅनर घेऊन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.वेळोवेळी आरे बचावच्या आंदोलनाला ‘राजकीय’ रंग देण्याचा प्रयत्न केला गेला. पण आमचा रंग आणि हेतू कायम आहे. सरकार, पक्ष बदलत राहतील. आमची मागणी कायम एकच राहील. नव्या सरकारला शुभेच्छा आणि पहिल्याच दिवशी त्यांनी दिलेल्या वचनाची (आरे जंगल घोषित करू) आठवण करून द्यायला आम्हीदेखील शपथविधीला पोहोचलो आहोत, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले.आरे कन्झर्व्हेशन ग्रुपचे सदस्य रोहित जोशी म्हणाले, आरे हे जंगल घोषित करू, असे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीदरम्यान सांगितले होते. शिवसेनेची सत्ता आली असून आरे हे जंगल घोषित करण्याकरिता त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी काही पर्यावरणप्रेमी शपथविधी सोहळ्याला हजर राहिले होते. पर्यावरणप्रेमींनी ‘सेव्ह आरे’चा हिरव्या रंगाचा बॅनर हाती घेतला होता. आता तुम्ही दिलेल्या आश्वासनाला जागून इथून पुढे आरेमध्ये कोणताही विकास प्रकल्प येऊ देऊ नका. आरे ‘ना विकास क्षेत्र’ म्हणून लवकरच घोषित करा.शिवसेना भवनाजवळ पर्यावरणप्रेमी एकवटले मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर आरेतील पर्यावरणप्रेमी शिवसेना भवनाजवळ एकवटले होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अशी मागणी या पर्यावरणप्रेमींनी केली.शिवसेना सत्तेत आल्याने आरे कारशेडचे काय होणार?मुंबई : राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. या तीनही पक्षांमधील नेत्यांनी कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेच्या कारशेडला आरेमध्ये उभारणीस विरोध दर्शवला होता. आता या तीनही पक्षांचे राज्यात एकत्रित सरकार स्थापन झाल्याने आरेमध्ये उभारण्यात येणाऱ्या कारशेडचे काय होणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेचे कारशेड आरेमध्ये उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली. या वेळी या वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांनी कडाडून विरोध केला होता. यासह आरेमध्ये कारशेडमध्ये झालेल्या वृक्षतोडीनंतर युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी याविरोधात आवाज उठवला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सत्ता आल्यावर पाहून घेऊ, आरे जंगल म्हणून घोषित करू, अशी घोषणा त्या वेळी केली होती. आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे हेच आश्वासन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पाळणार का, असा प्रश्न सोशल मीडियावर विचारण्यात येत आहे.आरे कॉलनीतील कारशेडविरोधी आंदोलनाचा तितकासा परिणाम विधानसभा निवडणुकांवर झालेला नाही. प्रस्तावित आरे कारशेड ज्या भागात आहे तिथले युतीचे सर्व उमेदवार विजयी झाले. मतपेटीतून राग व्यक्त करावा, असे आवाहन आंदोलकांनी जनतेला केले होते. शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनेही आरेमध्ये कारशेड उभारणीसाठी करण्यात येणाºया वृक्षतोडीला विरोध दर्शवला होता. यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आरेमध्ये मेटो-३ साठी उभारण्यात येणाºया कारशेडला विरोध दर्शवत शिवसेनेची महापालिकेमध्ये सत्ता असताना वृक्ष प्राधिकरणातर्फे परवानगी कशी देण्यात आली, असा सवाल उपस्थित केला होता. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे एकत्रितपणे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. यामुळे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे (एमएमआरसीएल) मेट्रो-३ मार्गिकेसाठी आरेमध्ये उभारण्यात येणाºया कारशेडचे काय होणार, असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यात ‘सेव्ह आरे’, आरे जंगल घोषित करा, पर्यावरणप्रेमींची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 3:52 AM