मुंबई - नव्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आसामसह ईशान्य भारतातील इतर राज्यांत पेटलेल्या आंदोलनाची धग शुक्रवारी आणखी वाढली. गुवाहाटीमध्ये संचारबंदीला न जुमानता लोक रस्त्यावर उतरून निदर्शने करत असून बाजारपेठा, दुकाने सर्व बंद आहेत. वाहतूक व जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या आसाम बंदचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहेत. मुंबईतील राहणाऱ्या आसाममधील नागरिकांनी आझाद मैदानात आंदोलन उभारले आहे.
संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या या दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे कायद्यात रूपांतर झालेल्या कायद्याविरोधात आंदोलनाने सर्वात रौद्र रूप आसाममध्ये धारण केले आहे. तिथे निदर्शनांमुळे सर्व रस्ते बंद असल्याने काही रेल्वे स्थानके व विमानतळावर अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. देशाच्या विविध भागांमधून आसाममध्ये जाणाऱ्या विमानसेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
ईशान्य भारतातील गुवाहाटी, दिब्रुगढ, तेजपूर, देकियादुली येथे बेमुदत तर जोरहाट, गोलाघाट, तीनसुकिया, चराईदेव येथे रात्री संचारबंदी आहे. राज्यातील १० जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंदच आहे. मेघालयमधील तणाव आता कमी आहे. हिंसाचार व जाळपोळीचे प्रकार करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशारा आसामचे मुख्यमंत्री सर्वनंद सोनोवाल यांनी शुक्रवारी दिला. जनतेच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असेही त्यांनी म्हटले आहे. या कायद्यातून ईशान्य भारतातील सर्व राज्ये वगळण्यात यावीत, अशी मागणी नॅशनल पीपल्स पार्टीच्या नेत्या अगाथा संगमा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.