लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेली कथित विधाने, पटोलेंनी आणलेला ट्विस्ट आणि त्यातून भाजपच्या नेत्यांशी त्यांचा सुरू असलेला कलगीतुरा सोमवारी पुन्हा रंगला. पटोलेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली, तर भाजप नेत्यांनाच उपचारांची गरज आहे, असा प्रतिटोला पटोले यांनी हाणला.
‘मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो’, असे विधान पटोले यांनी केले होते. त्यातच ‘ज्याची बायको पळते त्याचे नाव मोदी पडते’ असे विधान करून त्यांनी आणखी वाद निर्माण केला. पत्रकारांनी याकडे लक्ष वेधले असता फडणवीस म्हणाले की, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून, त्यांना चांगल्या डॉक्टरना दाखवा अशी माझी काँग्रेसच्या नेतृत्वाला विनंती आहे. भंडारा, गोंदियातही पटोले काँग्रेसची नाव वाचवू शकले नाहीत, त्या नैराश्यातून ते बोलत आहेत.
पटोले पत्र परिषदेत म्हणाले की, आपण पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल नाही, तर एका गावगुंडाबद्दल बोललो होतो हे आधीच स्पष्ट केल्यानंतरही राज्यातील भाजपचे नेते एका गावगुंडाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संबंध जोडून त्यांची बदनामी करत आहेत. राज्यातील भाजप नेते वैफल्यग्रस्त झाले असून, त्यांना गावगुंड आणि पंतप्रधानांमधील फरक समजेनासा झाला आहे. त्यांना उपचाराची जास्त गरज आहे.
‘खुशाल पुतळे जाळावेत’भाजपला माझे पुतळे जाळायचे असतील तर त्यांनी खुशाल जाळावेत; पण भारत माता की जय म्हणून जे लोक देश विकत आहेत त्यांचे पुतळे जाळा, बेटी बचाव, बेटी पटाव म्हणणाऱ्यांचे पुतळे जाळा, शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारणाऱ्यांचे पुतळे जाळा. ज्यांच्यामुळे देशाची अधोगती सुरू आहे त्यांचेही पुतळे त्यांनी जाळावेत, असेही पटोले यांनी सुनावले. माझे मानसिक संतुलन बिघडले आहे असे म्हणणारे फडणवीस यांचेच खरेतर मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसत आहे. नगर पंचायत निवडणुकीत विदर्भात काँग्रेसने भाजपला धूळ चारली. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे.