उपचाराचा खर्च वाचवण्यासाठी ग्राहकाला फेकले रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 01:30 AM2019-08-05T01:30:49+5:302019-08-05T06:48:10+5:30
सहा तासांत गुन्ह्याची उकल; खार पोलिसांकडून तिघांना अटक
मुंबई : ताडीचे अतिसेवन करून तेथीलच शौचालयात पडल्याने एक ग्राहक जखमी झाला. त्यातच मालकाने शुद्धीवर येण्यासाठी त्याला सूर्यफुलाचे तेल लावले. यात त्याचा त्रास आणखी वाढल्याने ग्राहकाचा उपचाराचा खर्च वाचविण्यासाठी त्याला शनिवारी रात्री रस्त्यावर फेकले. तसेच पुरावा मिटविण्यासाठी त्याचा मोबाइलही गायब केला. मात्र नैसर्गिक मृत्यू वाटणारा हा प्रकार हत्या असल्याचे उघड झाले आणि अवघ्या सहा तासांत तिघांना खार पोलिसांनी अटक केली.
खार पश्चिमच्या रोड क्रमांक १७ वर एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत सापडल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला आला. त्यानुसार खार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या इसमाला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरने त्याला तपासले तेव्हा अंतर्गत दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला. नंतर डोक्याला दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले.
या प्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दया नायक आणि नंदकिशोर गोपाळे यांनी तपास सुरू केला. त्याच दरम्यान मयताची आई विमल मोरे (६०) या पोलीस ठाण्यात आल्या. त्यांचा मुलगा सुनील (३९) हा ताडी पिण्यासाठी गेला होता आणि परतलाच नाही, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. तेव्हा रुग्णालयात मयताची ओळख पटली. त्यांचा जबाब पोलिसांनी नोंदविला. त्यादरम्यान सुनीलचा मोबाइल गायब असल्याचे मयताची आई विमल मोरे यांनी पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी सुनीलच्या मोबाइल क्रमांकाचा सीडीआर पडताळला. त्यात त्याचे मनोहर बेनारे, योगेश सावंत, विष्णू जोशी आणि लक्ष्मण जोशी यांच्याशी शेवटचे बोलणे झाल्याची माहिती त्यांना मिळाली. तेव्हा त्या चौघांनाही ताब्यात घेत त्यांची चौकशी करण्यात आली आणि या हत्येमागचे गूढ उघड झाले.
बेशुद्ध सुनीलला सोडून निघाले
जोशी, बेनारे आणि सावंतच्या चौकशीत सुनीलसोबत २ आॅगस्ट रोजी रात्री खारच्या जवाहरनगर परिसरात ते बलाजी ताडीमाडी विक्री केंद्रात ताडी पिण्यासाठी गेले होते. सुनीलने ताडीचे अतिप्राशन केल्याने तो नशेत होता. त्या अवस्थेत तो स्वच्छतागृहात जात असताना डोक्याच्या दिशेने खाली पडला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. तेव्हा नशा उतरविण्यासाठी ताडी विक्रेता केंद्राचा मालक गोपाल नरेला (२४) याने सुनीलच्या नाकाला सूर्यप्रकाश तेल लावले. मात्र त्यामुळे बेशुद्धावस्थेत असलेल्या सुनीलला श्वास घेण्यास अधिकच त्रास होऊ लागला. सुनीलला इथेच झोपू दे, तो उद्या सकाळी येईल, असे गोपालने आम्हाला सांगितले; त्यामुळे आम्ही रिक्षा पकडून तेथून निघून गेलो, असे जोशी, बेनारे आणि सावंतने तपास अधिकाऱ्यांना सांगितले.
मोबाइलचा शोध सुरू!
सुनीलचे मित्र निघून गेल्यावर त्याची प्रकृती ढासळत असल्याचे नरेलाच्या लक्षात आले. तेव्हा त्याच्यावर उपचार करण्याचा खर्च करावा लागेल म्हणून त्याचे कर्मचारी महेश वडेट्टी आणि साईकुमार वाखाला यांच्या मदतीने त्याने सुनीलला रिक्षात बसवले आणि त्याचा मोबाइल काढून घेत त्याला रोड क्रमांक १७ वर नेऊन टाकले. शरीराला अपायकारक असलेली ताडी प्यायल्यावर वेळीच उपचार न मिळाल्याने सुनीलचा मृत्यू झाला. त्यानुसार नेरेला आणि त्याच्या दोन्ही कर्मचाऱ्यांना अवघ्या सहा तासांत अटक करण्यात आली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून सुनीलच्या मोबाइलचा शोध सध्या सुरू आहे.