वीज ग्राहकांसाठी उपाय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘वर्क फ्रॉम होम’मुळे अनेकजण सध्या घरूनच काम करीत आहेत. त्यामुळे विजेचा वापर वाढल्याने वीज बिल जास्त येणार अशी भीती अनेकांना आहे. त्यासाठी लॅपटॉप, डेस्कटॉप वापरात नसताना पॉवर ऑफ करा. त्यातून ४० टक्के वीज वाचते. लॅपटॉप हा फक्त ९० वॅट वीज वापर करतो. त्यामुळे तो वापरण्याला प्राधान्य द्या. तसेच जागाही कमी घेतो. तर ऊर्जा बचतीचे पंचतारांकित सीलिंग फॅन वापरा. त्यातून ६० टक्के कमी ऊर्जा खर्च होते. पंख्याचे रेग्युलेटर पारंपरिक ( रेसिस्टिव्ह / मेकॅनिकल) ऐवजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीचे वापरा, असा सल्ला वीज कंपन्यांनी दिला आहे.
३६ किंवा ४० वॉटचे टी८ / टी१२ किंवा २८ वॉटचे टी ५ ट्यूबलाइट्स २० वॉटच्या एलईडी दिव्यांनी बदला. त्याद्वारे कमी वीज वापरात तेवढाच अथवा अधिक प्रकाश मिळतो. चमकणारे किंवा सीएफएल दिवे एलईडी दिव्यांनी बदला. त्यामुळे ५० टक्के विजेची बचत होते व त्याचे वयोमान सहा ते दहापट अधिक असते, असे अनेक उपाय वीज कंपन्यांनी वीज ग्राहकांना उन्हाळ्यातील वीज बचतीसाठी दिले आहेत. शिवाय असे केल्यास वीज बिल कमी येण्यास मदत होईल यावरही जोर दिला आहे.
अदानी इलेक्ट्रिसिटी या वीज कंपनीने त्यांच्या ३० लाख ग्राहकांना उन्हाळ्यात एसी, वॉशिंग मशीन, फ्रिज, पंखे, दिवे, लॅपटॉप, डेस्कटॉप व अन्य उपकरणांसह वीज कशी वाचवावी, यासाठी काही सूचना दिल्या आहेत. लॉकडाऊनदरम्यान ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू असल्याने विजेचा अतिरिक्त वापर होत आहे. ग्राहकांच्या मदतीसाठी, ऊर्जा संवर्धनासंबंधी संकेतस्थळावर एसी व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरासंबंधी टिप्स दिल्या आहेत. त्यामध्ये प्रश्न विचारण्यात आले असून विविध उपकरणांचा सर्वोत्तम वापर कसा करायचा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
दुसरीकडे उन्हाळ्यात ग्राहक एअर कंडिशनर्स वापरतात. त्याचा एकूण वीज बिलात ७० टक्के वाटा असतो. त्याखेरीज हे एसी २४ अंशांवर वापरण्याऐवजी, अनेक ग्राहक तापमान १८ अंशांपर्यंत घटवतात. त्यामुळे ४० टक्के अतिरिक्त वीज वापर होतो. त्यातून उच्च किमतीचे बिल येते. त्यात सध्याच्या महामारीच्या काळात, अनेक कार्यालयांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेली ‘वर्क फ्रॉम होम’ची परवानगी लॅपटॉप, डेस्कटॉप व विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढवतो. त्यामुळे साधे उपाय वापरून वीज वाचवा, असे आवाहन वीज कंपन्यांनी केले आहे.
* अशी करा विजेची बचत
एअर कंडिशनर
- तापमान खूप कमी अंशांवर सेट करू नका. २४ ते २५ अंश सेल्सिअस हे मानवी शरीरासाठी पुरेसे असते.
- एसी लावलेला असताना थंड हवेची गळती थांबविण्यासाठी खोलीचे दरवाजे, खिडक्या घट्ट बंद करा
- एसीचे तापमान १ अंशांने वाढवले तरी त्यातून ६ टक्के वीज बचत होते. वार्षिक १५०० रुपयांची बचत होते.
- उन्हाळ्यात एसीचा वापर करण्याआधी तो स्वच्छ करा.
- एसीसोबत पंखा लावल्यास थंडपणामध्ये वाढ होते
फ्रिज
- फ्रिज व भिंत, यामध्ये किमान सहा इंचाची जागा ठेवा.
- ४ किंवा ५ तारांकित ऊर्जा बचतीचे फ्रिज घ्या.
- गरम अन्न बाहेरच थंड होऊ द्या व नंतर फ्रिजमध्ये ठेवा
वॉशिंग मशीन
- गरम पाण्याच्या सेंटिगऐवजी थंड पाण्याच्या सेटिंगनेच कपडे धुवा. यामुळे ९० टक्के विजेची बचत होते
- कपडे वॉशिंग मशीनच्या ड्रायरने सुकविण्याऐवजी उन्हात किंवा नैसर्गिक हवेत वाळू द्या.
...................................