खाडीपुलावरून उडी टाकून भावी पत्नीला वाचविले
By admin | Published: July 3, 2015 01:26 AM2015-07-03T01:26:49+5:302015-07-03T01:26:49+5:30
होणाऱ्या नवऱ्याबरोबर झालेल्या किरकोळ भांडणाचा राग येऊन तरुणीने वाशी खाडीपुलावरून उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला.
नवी मुंबई : होणाऱ्या नवऱ्याबरोबर झालेल्या किरकोळ भांडणाचा राग येऊन तरुणीने वाशी खाडीपुलावरून उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत तिच्या भावी पतीने पाण्यात उडी मारून तिचे प्राण वाचविले. दोघांवरही वाशीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रीना शुक्ला (३५) व अविनाश विजय मती (३७) अशी या जोडप्याची नावे आहेत. दोघेही नेरूळ येथील रहिवासी असून यापैकी अविनाश हा मरीन इंजिनीयर तर रीना ही शेअर्स ब्रोकर म्हणून काम करते. त्या दोघांचेही लग्न ठरले आहे. मात्र लग्नाच्या तारखेवरून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता.
आज संध्याकाळी हे दोघे कारने मुंबईहून नेरूळकडे येत होते. या प्रवासादरम्यान त्यांच्यात लग्नाच्या तारखेवरून पुन्हा पुन्हा भांडण झाले. त्यामुळे चिडलेल्या रीनाने वाशी खाडीपुलावर गाडी थांबवायला सांगितली. गाडी थांबताच खाली उतरून तिने पाण्यात उडी टाकली. या प्रकाराने भांबावलेल्या अविनाश याने पोहता येत असल्याने तिला वाचविण्यासाठी तिच्या मागोमाग खाडीत उडी मारली. मात्र तिला वाचविण्याच्या नादात ते दोघेही पाण्यात बुडू लागले.
काही अंतरावर असलेल्या दोन मच्छिमारांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तातडीने धाव घेत दोघांनाही आपल्या बोटीतून किनाऱ्यावर आणले. बेशुद्ध अवस्थेत दोघांनाही वाशीच्या एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अविनाश शुद्धीवर आला असून त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, रीना हिच्यावर उपचार सुरू असून तिच्या जीवाचा धोका टळल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरज पाडवी यांनी दिली. (प्रतिनिधी)