‘मुंबईचे हिरवेगार फुप्फुस वाचवा’; महालक्ष्मी रेसकोर्स वाचविण्यासाठी ऑनलाइन चळवळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 10:07 AM2024-01-16T10:07:02+5:302024-01-16T10:11:42+5:30
महालक्ष्मी रेसकोर्स वाचविण्यासाठी ऑनलाइन चळवळदेखील सुरू झाली आहे.
मुंबई :मुंबईचे हिरवेगार फुप्फुस म्हणून ओळख असलेले महालक्ष्मी रेसकोर्स वाचविण्यासाठी ऑनलाइन चळवळदेखील सुरू झाली असून, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही ऑनलाइन स्वाक्षरी मोहिमेला पाठिंबा देण्याचे आवाहन सोशल मीडियावरून केले आहे.
महालक्ष्मी रेसकोर्सच्या मोकळ्या जागेचा वापर मुंबईकर रोज योगासने, धावणे, चालण्यासाठी करतात. मात्र एका बिल्डरला हाताशी धरून सरकार ही जागा घशात घालण्याचा प्रयत्न करत आहे, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर केले आहे. त्यामुळे महालक्ष्मीची मोकळी जागा वाचविण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ऑनलाइन स्वाक्षरी मोहिमेला बळ द्यावे, असे त्यांनी आवाहन केले आहे.
८ हजार जणांची स्वाक्षरी :
‘सेव्ह महालक्ष्मी रेसकोर्स-दी ओन्ली ग्रीन लंग्ज ऑफ मुंबई’ या मथळ्याखाली सुरू झालेल्या ऑनलाइन पिटीशनला पाठिंबा देत सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १८ हजार ४१५ जणांनी स्वाक्षरी केली आहे. तर २५ हजार जणांच्या स्वाक्षरीचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. दरम्यान, ऑनलाइन पिटीशनवर महालक्ष्मी रेसकोर्सची माहिती देतानाच हा परिसर मुंबईकरांसाठी किती महत्त्वाचा आहे ? याचे दाखले देण्यात आले आहेत.