देशातील नद्या वाचविणे आपले सर्वांचे कर्तव्य, जलपुरुष राजेंद्र सिंह यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 05:33 AM2018-09-29T05:33:10+5:302018-09-29T05:33:33+5:30
देशातील काही नद्या मृत होण्याच्या मार्गावर आहेत. नद्या प्रदूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नद्यांना वाचविणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. नदी स्वच्छ राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी ‘जागतिक नदी दिना’निमित्त केले.
- कुलदीप घायवट
मुंबई - नदीला थांबवून तिच्या प्रवाहाला अडवू नका, नदीला वाहू द्या. देशातील काही नद्या मृत होण्याच्या मार्गावर आहेत. नद्या प्रदूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नद्यांना वाचविणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. नदी स्वच्छ राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी ‘जागतिक नदी दिना’निमित्त केले. ते ‘लोकमत’सोबत बोलत होते.
कोणताही विचार न करता नदी परिसरात बिल्डिंग, रस्ते अतिक्रमण होत आहे. परिणामी नदीची रुंदी कमी होते. या कारणाने नदी मृत होण्याचे कारण आहे. झाडे तोडल्यानेदेखील नदी परिसर कमी होत आहे. महापालिकेने सांडपाण्याच्या वाहिन्या नदीत सोडल्याने नदीचे रूपांतर नाल्यात होत आहे. वीजनिर्मितीसाठी नदीवर बांध उभारले जातात.
नदीचा प्रवाह अडवून एका ठिकाणी मोठा बांध उभारल्यावर नदीचा मुख्य प्रवाह मंदावतो. यामुळेदेखील नदी मृत होते. वीजनिर्मिती प्रकल्पामुळे नदीच्या परिसरातील जैवविविधता विस्कळीत होते. वीजनिर्मितीसाठी सौरऊर्जेचा वापर केला जावा किंवा इतर पर्याय शोधून काढले पाहिजेत.
पाणी वाचविण्यासाठी रेनवॉटर हॉर्वेस्टिंग उत्तम सुविधा आहे. शहरात पावसाचे पाणी नाले, गटारात जाऊन समुद्राला मिळते. रेनवॉटर हॉवेस्टिंग उपक्रम राबविल्यास निसर्गाने मोफत दिलेल्या पावसाच्या पाण्याची बचत होईल. जे पाणी आपल्याला मिळते त्याचा वापर योग्यरीत्या करणे आवश्यक आहे. काही भागात जास्त पाऊस पडतो; तर काही भागात कमी पाऊस पडतो. जेथे जास्त पाऊस पडतो तेथे पाण्याची बचत केली पाहिजे. कमी पाऊस पडणाऱ्या भागातील नागरिकांनी पाण्याची गरज कमी केली पाहिजे.
जीवसृष्टी धोक्यात येण्याची वाट बघू नका
पाऊस पडल्याने एकाच वेळी नद्यांमध्ये पाणी वाढून पूर येण्याची भीती आहे, तर दुसरीकडे दुष्काळ पडला की सर्व भागात दुष्काळाची समस्या निर्माण होईल. नदी जोड प्रकल्पावर शास्त्रीयदृष्ट्या विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे. नदीवरून अनेक राज्यांपासून ते गावा-गावापर्यंत भांडणे होतात. मात्र या सर्वांनी आपली मानसिकता बदलून नदी १२ महिने सदा वाहती राहण्यासाठी काम केले पाहिजे. सर्वांनी पुढाकार घेऊन नदीला वाहती ठेवणे हीच काळाची गरज आहे. सर्व जीवसृष्टी धोक्यात येण्याची वेळ पाहत बसणे योग्य ठरणार नाही.