‘आरे वाचवा’चा संदेश खोडला; पर्यावरणप्रेमींचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 06:02 AM2018-09-17T06:02:55+5:302018-09-17T06:03:12+5:30
हरित लवादाचा आदेश झुगारून गोरेगाव येथील आरेत मेट्रोचे बांधकाम सुरू असल्याचा पर्यावरणवाद्यांचा आरोप आहे.
मुंबई : हरित लवादाचा आदेश झुगारून गोरेगाव येथील आरेत मेट्रोचे बांधकाम सुरू असल्याचा पर्यावरणवाद्यांचा आरोप आहे. याचा निषेध करत पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी गणेशोत्सवाचे औचित्य साधत, आरे कॉलनीमधील झाडांच्या खोडावर पर्यावरणप्रेमींनी गणपतीचे चित्र रेखाटले. आरे कॉलनी परिसरातील सात-आठ झाडांवर अशा प्रकारे बाप्पाचे चित्र रेखाटत, या झाडांवर ‘आरे वाचवा’ असा संदेश पर्यावरणवाद्यांनी लिहिला होता. मात्र, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी संदेश खोडल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे. मेट्रो प्रशासनाकडून केवळ संदेश खोडण्यात आला नाही तर सोबतच काही झाडांवर चित्र रेखाटण्यासही मनाई करण्यात आल्याची माहिती पर्यावरणवादी अमृता भट्टाचार्य यांनी दिली.
जागृतीचा प्रयत्न
पर्यावरणाचा ºहास होऊ नये, असे काम मेट्रोने करू नये, हाच उद्देश असून, जनजागृतीसाठी झाडांवर बाप्पाचे चित्र रेखाटल्याचे, वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद, तसेच आरे संवर्धन गु्रपचे सदस्य रोहीत जोशी यांनी सांगितले.