पाणमांजरे अन् मगरींना वाचवू; संवर्धनासाठी कोकणात होणार अभ्यास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 06:23 AM2022-05-22T06:23:38+5:302022-05-22T06:24:28+5:30
वातावरणातील बदल, नैसर्गिक अधिवासांमध्ये मानवी हस्तक्षेप वाढल्याने चिंता
सचिन लुंगसे
मुंबई : वातावरणातील बदल, अधिवासाचा ऱ्हास, नैसर्गिक अधिवासांमध्ये मानवी हस्तक्षेप हे पाणमांजरे आणि मगरींसाठी प्राथमिक धोके आहेत. भविष्यातील धोके ओळखून त्यांच्या संवर्धनासह संरक्षणासाठी आता त्यांचा अभ्यास मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात करण्यात येणार आहे. यापूर्वी महाराष्ट्र कांदळवन कक्ष आणि पुण्यातील एला फाऊंडेशन, एनजीओने संयुक्तपणे केलेल्या अभ्यासातून रत्नागिरी जिल्ह्यात १४०० पाणमांजरे आणि २४५ मगरी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या अनुसूचीनुसार लुप्तप्राय प्रजाती म्हणून संरक्षित असलेल्या आणि इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचरनुसार असुरक्षित म्हणून गुळगुळीत कातडीच्या पाणमांजरांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारची गणना दुसऱ्यांदा करण्यात आली आहे. याआधी २०१७ मध्ये याच अभ्यास गटाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५०० पाणमांजरांची नोंद केली होती. पाणमांजर या सस्तन जलचराचा पुरेसा अभ्यास झालेला नाही. सागरी क्षेत्रात अधिवास असलेल्या मगरींचे पुरेसे दस्तावेजकरण झालेले नाही. त्यामुळे आता अभ्यास हाती घेतला आहे.
कांदळवन महत्त्वाचे आहे; कारण?
पाणमांजर कांदळवनांमध्ये किंवा कांदळवन परिसरात असते. या अधिवासाच्या ठिकाणी जाणे सहज शक्य नसते. या प्रजाती टिकून राहण्यासाठी कांदळवन महत्त्वाचे आहेत. या प्राण्यांना कांदळवन सुरक्षित अधिवास देते. हा अधिवास इतरही अनेक जलचर प्रजातींना आधार देतो.
सध्या हाती आलेल्या निष्कर्षांचा वापर करून आपण पाणमांजर आणि मगरी या दोन्ही प्रजातींच्या संरक्षणात वृद्धी करू शकतो. या सस्तन प्राण्यांचा अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी मॅनग्रोव्ह फाऊंडेशनमार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या प्रजातींची संख्या कमी होऊ नये, याची खातरजमा करण्यासाठी किनारपट्टीच्या भागात राहणारे नागरिक व संशोधकांच्या मदतीने या सस्तन प्राण्यांच्या व सरीसृप प्राण्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न केले जातील.
- वीरेंद्र तिवारी, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष
पाणमांजर हा शोधण्यास अत्यंत कठीण असलेला जलचर प्राणी आहे. तो जमिनीवर व पाण्यात विहार करू शकतो. तर मगरी या मानव-प्राणी संघर्षाचे एक कारण आहेत. या दोन्ही प्रजाती आपल्या जल परिसंस्थेतील अत्यंत संवेदनशील गुणक आहेत.
- सतीश पांडे, संचालक, एला फाऊंडेशन