जुहू चौपाटीवर २४ वर्षात वाचवले ५५० बुडणाऱ्यांचे प्राण; निवृत्तीच्या दिवशी वरिष्ठांकडून सन्मान
By मनोहर कुंभेजकर | Published: December 1, 2024 08:13 PM2024-12-01T20:13:09+5:302024-12-01T20:15:04+5:30
मनोहर शेट्टी वयोमायानुसार पालिकेच्या जीवरक्षक सेवेतून निवृत्त झाले.
मुंबई-पर्यटकांना समुद्राचे आकर्षण असते.आणि अनेक जण आणि विशेष करून तरुण पिढी समुद्रात पाय मोकळे करायला,पोहायला उतरतात. अनेकवेळा पाण्याच्या करंटचा अंदाज येत नसल्याने दरवर्षी विशेष करून उन्हाळ्याच्या दिवाळीच्या सुट्टीत समुद्रात उतरलेले पर्यटक बुडण्याच्या घटना घडतात आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचे सावट येते.
समुद्रात उतरणाऱ्या पालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाच्या कायमस्वरूपी आणि दृष्टी लाईफ सेविंग कंपनीच्या कंत्राटी जीवरक्षक डोळ्यात तेल घालून त्यांच्यावर लक्ष ठेवतात. शनिवार,रविवार आणि सुट्टीच्या दिवशी सुमारे ८ ते १० हजार पर्यटक जुहू चौपाटीवर येतात त्यातील अनेक जण पाण्यात उतरतात. आपल्या जून २००० ते ३० नोव्हेंबर या सुमारे २४ वर्षांच्या जीवरक्षक म्हणून कारकीर्दीत जुहू चौपाटीवर कार्यरत असलेले पालिकेच्या मनोहर शेट्टी यांनी येथील पाण्यात पोहायला उतरलेल्या सुमारे ५५० पर्यटकांसाठी ते देवदूत ठरले असून त्यांनी त्यांचे प्राण वाचवले आहेत.
काल वयोमायानुसार ते पालिकेच्या जीवरक्षक सेवेतून निवृत्त झाले. मनोहर शेट्टी यांचा सपत्नीक अंधेरी पश्चिम येथील अग्निशमन केंद्रात त्यांचा शाल, सन्मान चिन्ह,पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देवून येथील विभागीय सहाय्यक अग्निशामक अधिकारी सचिन तळेकर यांनी सत्कार केला. यावेळी येथील वरिष्ठ केंद्र अधिकारी अमोल खानोलकर,केंद्र अधिकारी रवी पावडे,तसेच शेट्टी यांच्या पत्नी विजयालक्ष्मी शेट्टी उपस्थित होत्या.
यावेळी या मान्यवरांनी तसेच जीवरक्षक सोहेल मुलानी,फायरमन महावीर गिरी,फायर यंत्रचालक तानाजी केमसे तसेच शेट्टी यांच्या कन्या डॉ.जैना शेट्टी यांनी जीवरक्षक मनोहर शेट्टी यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच मनोहर शेट्टी यांचा भायखळा येथील कार्यालयात मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी रवींद्र आंबूलगेकर आणि उपमुख्य अधिकारी संतोष सावंत यांनी सन्मानचिन्ह देवून गौरव केला.
सत्काराला उत्तर देतांना मनोहर शेट्टी म्हणाले की, १०एप्रिल १९९० साली कंत्राटी जीवरक्षक म्हणून अंधेरी क्रीडा संकुललात रुजू झालो.१९९१ ते २००० पर्यंत शिवाजी पार्क येथील महात्मा गांधी जलतरण तलावात कंत्राटी जीवरक्षक म्हणून कार्यरत होतो. त्यानंतर ५ जून २००० ते ५ जून २०११ पर्यत आरोग्य खात्यात आणि २०११ ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत मुंबई अग्निशमन दलाच्या सेवेत अशी एकूण सेवा ३४ वर्षे ६ महिने २० दिवस अशी सेवा बजावली. जुहू बीच सेवेत असतांना ५५० बुडणाऱ्यांचे प्राण वाचवले. पालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाच्या संबधीत अधिकारी व अंधेरी पश्चिमचे स्थानिक भाजप आमदार अमित साटम आणि जुहूचे जीवरक्षक सोहेल मुलानी यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.