१ युनिटची बचत म्हणजे २ युनिट विजेची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:12 AM2019-12-16T00:12:01+5:302019-12-16T00:12:03+5:30

ऊर्जा संवर्धन सप्ताह : महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाने केले आवाहन

Saving 1 unit means generating 2 units of electricity | १ युनिटची बचत म्हणजे २ युनिट विजेची निर्मिती

१ युनिटची बचत म्हणजे २ युनिट विजेची निर्मिती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सध्या ७० टक्क्यांपेक्षा जास्त वीज ही पारंपरिक इंधनापासून निर्माण केली जात असून, पारंपरिक इंधनाचे साठे म्हणजे कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू हे मर्यादित आहेत. परिणामी ऊर्जास्रोत वापरतानाच अपारंपरिक ऊर्जास्रोत वापरण्यावरही भर दिला पाहिजे, असे आवाहन करत वीज वापरातील १ युनिटची बचत म्हणजे अंदाजे २ युनिटची निर्मिती होय, अशी माहिती महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाने दिली.
१४ ते २० डिसेंबर या काळात ऊर्जा संवर्धन सप्ताह साजरा केला जात असून, १४ डिसेंबर हा राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे. या सप्ताहांतर्गत महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाने (महाऊर्जा) ऊर्जा बचतीचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार, औद्योगिक क्षेत्रात प्रतिवर्षी सुमारे ३८ टक्के विजेचा वापर होत असून, यामध्ये २५ टक्के ऊर्जा बचतीस वाव आहे. कृषी क्षेत्रात प्रतिवर्षी २३ टक्के विजेचा वापर होत असून, ३० टक्के ऊर्जा बचतीस वाव आहे. वाणिज्यिक क्षेत्रात प्रतिवर्षी १२ टक्के विजेचा वापर होत असून, यात ३० टक्के ऊर्जा बचतीस वाव आहे. घरगुती क्षेत्रात प्रतिवर्षी २२ टक्के विजेचा वापर होत असून, यामध्ये २० टक्के ऊर्जा बचतीस वाव आहे. परिणामी वीज वापरताना विजेची बचत करण्यासही प्राधान्य दिले पाहिजे.
हे कराच...
च्सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वीज वापरली जाते. अशा वेळी सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ७ ते १० या वेळेत शक्यतो कमीत कमी वीज उपकरणांचा वापर करावा.
च्वाहन चालविताना ताशी वेग ४५ ते ५५ ठेवावा. योग्य गिअरचा वापर करावा. हवेचे व इंधनाचे फिल्टर वेळोवेळी स्वच्छ करावे.
च्स्वयंपाकासाठी प्रेशर कुकरचा वापर करावा; त्यामुळे इंधन वाचेल. गॅस वापरासाठी लहान बर्नरचा वापर करून ते नियमित स्वच्छ ठेवावे.

ऊर्जा परीक्षण करा
कारखाने, वाणिज्यिक संकुले, शासकीय कार्यालयांमध्ये अनेक वेळा गरज नसतानाही विद्युत उपकरणे सुरू ठेवली जातात. परिणामी ऊर्जेची बचत होत नाही. या कारणास्तव कारखाने, वाणिज्यिक संकुले, शासकीय कार्यालये इत्यादीमध्ये ठरावीक कालावधीनंतर ऊर्जा परीक्षण करून घ्यावे.
बांधकाम रचना महत्त्वाची
मुंबई शहर आणि उपनगरासह मुंबई महानगर प्रदेशात अनेक गृहनिर्माण प्रकल्प राबविले जातात किंवा मुंबईव्यतिरिक्त बाहेरगावी घरे मोठी असतात. अशी बांधकामे करताना किंवा इमारतीचे बांधकाम करताना आत भरपूर सूर्यप्रकाश व खेळती हवा राहील याप्रमाणे रचना करावी.
जेवढे स्टार तेवढी ऊर्जा बचत : अनेक वेळा आपण वीज उपकरणे खरेदी करताना पुरेशी काळजी घेत नाही. स्वस्तात स्वस्त वीज उपकरणे खरेदी करतो. मात्र अशी उपकरणे अनेक वेळा तापदायक असतात. अशा उपकरणांमुळे विजेचा वापरही अधिक केला जातो. या कारणास्तव स्टार लेबल असलेल्या उपकरणांचा वापर करावा. जेवढे जास्त स्टार तेवढी जास्त ऊर्जा बचत होय.

Web Title: Saving 1 unit means generating 2 units of electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.