बचत गटांनीही आॅनलाइन विक्री करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 01:46 AM2018-01-18T01:46:30+5:302018-01-18T01:46:38+5:30
अनेक कंपन्यांनी आपल्या वस्तूंची आॅनलाइन विक्री सुरू केली आहे. ई-कॉमर्स कंपन्या तर यातून हजारो कोटींचा व्यवसाय करत आहेत.
मुंबई : अनेक कंपन्यांनी आपल्या वस्तूंची आॅनलाइन विक्री सुरू केली आहे. ई-कॉमर्स कंपन्या तर यातून हजारो कोटींचा व्यवसाय करत आहेत. बचत गटांनीही आता ई-कॉमर्सचा वापर करत, आपल्या उत्पादनांची आॅनलाइन विक्री करावी, असे आवाहन राज्यपाल
सी. विद्यासागर राव यांनी बुधवारी केले.
वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाच्या उद््घाटनप्रसंगी राज्यपाल बोलत होते. या वेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दादाजी भुसे, आमदार तृप्ती सावंत आदी उपस्थित होते. आपल्या व्यवसायातून किमान १०० कोटींची उलाढाल होईल, असे ध्येय बचत गटांनी ठेवावे, असे आवाहन करून, राज्यपाल म्हणाले की, ‘महालक्ष्मी सरस’ हा गरीब, ग्रामीण व आदिवासी लोकांकरिता खरा ‘समृद्धी महामार्ग’ आहे. प्रत्येक मॉल, तसेच डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये ‘महालक्ष्मी सरस’ येथील उत्पादने वर्षभर उपलब्ध झाली पाहिजेत. येथील सर्व पदार्थ, तसेच उत्पादनांचे पॅकेजिंग, ब्रँडिंग व मार्केटिंग झाले पाहिजे. त्यामुळे शेतकरी, कामगार, महिला, तसेच कारागीर यांना योग्य आर्थिक मोबदला मिळेल. महिला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होते,
तेव्हा एका कुटुंबाचे जीवनमान सुधारते.
सध्या खादी कपड्यांची फॅशन आली आहे. दरवर्षी १५ आॅगस्ट, २६ जानेवारी व १ मे महाराष्ट्र दिवस या तीन दिवशी राज्यातील सर्वांनी केवळ खादी कपडे वापरण्याचा संकल्प करावा. त्यामुळे ग्रामीण भागातील कारागिरांना मोठी मदत होईल, असे आवाहन राज्यपालांनी केले.