सेव्हिअर तेरेसा...अवयवदानातून वाचवले चार भारतीयांचे प्राण; स्पेनच्या महिलेची ‘हृद्य’ कहाणी...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 06:25 AM2023-01-13T06:25:48+5:302023-01-13T06:25:58+5:30
स्पेनच्या ६७ वर्षीय मेंदूमृत महिलेची ‘हृद्य’ कहाणी...
मुंबई : पर्यटनाच्या निमित्ताने त्या भारतात आल्या. मात्र, पर्यटनाचा आनंद घेत असतानाच दबा धरून बसलेल्या काळाने ५ जानेवारी रोजी त्यांच्यावर झडप घातली. सर्व सगेसोयरे सातासमुद्रापार राहणारे. त्यांना तातडीने भारतात बोलावून घेण्यात आले. मुलांच्या संमतीने मेंदूमृत महिलेचे अवयवदान करण्यात आले. त्यामुळे चार भारतीयांना जीवनदान मिळाले. ही गोष्ट आहे तेरेसा फर्नांडिस यांची. अशा पद्धतीने परदेशी नागरिकाने मुंबईत अवयवदान केल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी २०१९ मध्ये नेपाळमधील एका व्यक्तीने मुंबईत अवयवदान केले होते.
६७ वर्षांच्या तेरेसा मूळच्या स्पेनमध्ये राहणाऱ्या. पर्यटनाच्या निमित्ताने काही मित्रमैत्रिणींबरोबर भारतात आल्या. मात्र, त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला. बुधवारी जसलोक हॉस्पिटलमध्ये तेरेसा यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले. दरम्यानच्या काळात त्यांचा मुलगा आणि मुलगी मुंबईत दाखल झाले. त्यांच्या संमतीने तेरेसा यांच्या अवयवांचे दान करण्यात आले. तेरेसा यांचे फुप्फुस, यकृत व दोन किडन्या भारतात प्रतीक्षायादीवर असलेल्या रुग्णांना देण्यात आले आहे. तर हृदय लेबनॉनमधील नागरिकाला देण्यात आले आहे.
चेन्नईतील हॉस्पिटलमध्ये...
हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी लेबनॉनमधील एक रुग्ण चेन्नईतील हॉस्पिटलमध्ये दाखल होता. अवयवदान करतेवेळी वैद्यकीयदृष्ट्या सक्षम रुग्ण राज्यात उपलब्ध नसेल तर तो अवयव नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनतर्फे (नोटो) इतर राज्यांतील प्रतीक्षायादीवरील रुग्णास दिला जातो. त्यानुसार चेन्नईतील लेबनानी रुग्णाला तेरेसा यांचे हृदयदान करण्यात आले.
अवयवदानात स्पेन अग्रेसर
अवयवदान विषयात स्पेन जगात अव्वल क्रमांकाचा देश आहे. या देशात अवयवदानास नागरिकांची संमती गृहीत धरली जाते. या संदर्भातील कायदा १९७९ मध्ये पास करण्यात आला आहे.
प्रतीक्षायादीवर ज्या रुग्णांची नोंद नियमाप्रमाणे असते त्यांना अवयव दिले जातात. त्याप्रमाणे या अवयवांचे वाटप करण्यात आले आहे.
- डॉ. सुरेंद्र माथुर, अध्यक्ष, मुंबई विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती