सावित्रीदेवी फुले वसतिगृहातील हत्या प्रकरण: कनोजिया मुलीच्या खोलीत पोहोचला कसा?
By मनीषा म्हात्रे | Published: June 9, 2023 08:32 AM2023-06-09T08:32:51+5:302023-06-09T08:35:51+5:30
काही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत.
मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : चर्नी रोड येथील सावित्रीदेवी फुले वसतिगृह तसे वर्दळीच्या ठिकाणी. त्यामुळे येथे जरा खुट्ट झाले की लगेचच कळते. मात्र, वसतिगृहात झालेल्या बलात्कार व हत्याकांड प्रकरणामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मृत आरोपी ओमप्रकाश कनोजिया वसतिगृहातील ‘त्या’ पीडित तरुणीच्या खोलीपर्यंत पोहोचला तरी कसा, हा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. काही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत.
पीडित तरुणीने वसतिगृहात प्रवेश केल्यानंतर...
- तरुणीने अकराच्या सुमारास मैत्रिणीसोबत इमारतीच्या आवारात प्रवेश केला.
- तेथून फोनवर बोलतच लिफ्टने ती वर गेली. त्यावेळी इमारतीच्या पॅसेजसह आवारातील सहा कॅमेरे सुरू होते.
- कनोजियाची केबिन वसतिगृहाच्या डक्ट लाइनजवळच होती.
- ओमप्रकाश कनोजिया हा वसतिगृहाच्या डक्ट लाइनजवळील मोकळ्या जागेचा आधार घेत पाइपच्या साहाय्याने वर गेला.
- पाइपच्या आधारे पहिल्या मजल्यापर्यंत गेल्यानंतर तो त्याच मार्गाने खाली उतरला.
- त्यानंतर कनोजियाने पुन्हा बाहेरच्या बाजूने असलेल्या ग्रीलच्या साहाय्याने चढण्याचा प्रयत्न केला.
- तो नेमका कशासाठी चढत होता, हे गूढच आहे. त्याचा तपास पोलिस करत आहेत.
- पहिला मजल्यावरून कनोजिया जिन्याने वर गेला असावा, असा अंदाज आहे.
- त्या ठिकाणी पोलिसांना त्याची चप्पलही सापडली. तसेच, काही फुटेजमध्ये तो वर चढण्याचा प्रयत्न करत असल्याचेही
दिसून आले.
पोलिसांचा अंदाज...
- मध्यरात्री दाेन वाजून २३ मिनिटाच्या सुमारास कनोजियाने तरुणीवर अतिप्रसंग करत तिची गळा आवळून हत्या केली असावी.
- त्याने दरवाजा ठोठावून आतमध्ये प्रवेश केला किंवा दरवाजाच्या आतील वरच्या बाजूस असलेली कडी दरवाजावर मोकळ्या असलेल्या जागेतून आतमध्ये हात घालून उघडली असावी.
- वरच्या कडीजवळ हाताचे काही ठसे सापडले आहेत. पोलिसांनी ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत.
- मंगळवारी पहाटे चार-सव्वा चारच्या सुमारास कनोजियाने इमारतीच्या पुढच्या बाजूला असलेल्या ग्रीलने पुन्हा वर चढण्याचा प्रयत्न केला.
- पहाटे ४:५८ ला कनोजियाने लोकलखाली आत्महत्या केली.