कांदिवलीतील महिलांचा सावित्री कट्टा
By admin | Published: March 16, 2016 08:36 AM2016-03-16T08:36:06+5:302016-03-16T08:36:06+5:30
कांदिवली (पश्चिम) येथील चारकोप सह्याद्री नगर (डी-२) आदिशक्ती महिला मंडळातर्फे स्वखर्चाने सावित्री कट्टा साकारण्यात आला आहे. कट्ट्याच्या उद्घाटनप्रसंगी
मुंबई : कांदिवली (पश्चिम) येथील चारकोप सह्याद्री नगर (डी-२) आदिशक्ती महिला मंडळातर्फे स्वखर्चाने सावित्री कट्टा साकारण्यात आला आहे. कट्ट्याच्या उद्घाटनप्रसंगी महिलांसाठी व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा, शिवणवर्ग या विषयांवर सुषमा राठोड व प्रशिक्षक मंगेश सावंत यांनी मार्गदर्शन केले. महिलांनी व्यासपीठावर बोलण्याची भीती कशी घालवावी, याविषयीही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले. महिलांसाठीच्या सरकारच्या विविध योजनांचे सादरीकरणही या वेळी करण्यात आले.
या वेळी उत्तम शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच चंद्रकांत हजारे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. या वेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या रसिका आनेराव यांनी महिलांशी संवाद साधला. प्रत्येक क्षेत्रात सध्या महिला अग्रेसर असून हे व्यासपीठदेखील महिलांसाठी आधारवड ठरेल, असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी विशाल सह्याद्री को-आॅप. हाऊसिंग सोसायटीचे पदाधिकारी तसेच महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धर्मराज जाधव, संदीपान शिंदे, ओमकार शिंदे यांच्यासह रुची माने, लीना देहेरकर, अलका कानाबार, रेश्मा टक्के आदी महिला कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या कट्ट्याचे उद्घाटन उत्तर मुंबईचे खासदार गोपाल शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. चारकोप सह्याद्री नगर येथे महिलांनी स्वखर्चातून हा कट्टा उभारल्याबद्दल शेट्टी यांनी महिलांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)