Join us  

सावित्रीबाई फुले पूल बंद असल्याने अमरमहल येथे वाहतूककोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 1:20 AM

अपघात टाळण्यासाठी प्रयत्न; एकेरी वाहतुकीने नागरिक वैतागले

मुंबई : घाटकोपर येथील लक्ष्मीबाग नाल्यावरील सावित्रीबाई फुले पूल धोकादायक असल्याने पालिकेने शुक्रवारी तो बंद केला. याचा वाहतुकीवर परिणाम होत असून, अमरमहाल जंक्शन येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे.

काही महिन्यांपूर्वी सीएसटीएम येथील हिमालय पूल दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील पुलांची पाहणी करण्यात आली. पालिकेच्या पाहणीत सावित्रीबाई फुले हा पूल धोकादायक असल्याचे आढळले. पावसाळ्याच्या तोंडावर अपघात टाळण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पालिकेने रस्त्यावर पत्रे लावून हा पूल बंद केला, परंतु त्याचा वाहतुकीवर परिणाम होत असून, त्यामुळे घाटकोपरसह अमर महल येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे, तसेच पूर्व द्रुतगती मार्ग, मानखुर्द-घाटकोपर लिंक रोड, विक्रोळी, भांडुप, कांजूर येथेही वाहतूककोंडी होत आहे.

या रस्त्याला पर्यायी मार्ग गांधीनगर सिग्नल, छेडानगर सिग्नल असला, तरी तो खूप लांब असल्याने वाहनांना मोठा वळसा घालून जावे लागणार आहे. अमरमहल उड्डाण पुलाखाली मुलुंडच्या दिशेने जाणाऱ्या दोनपदरी रस्त्यावरील एका भागात गेल्या तीन महिन्यांपासून काम सुरू असल्याने येथे एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यातच घाटकोपरचा पूल बंद झाल्याने नागरिकांना आणखी मनस्ताप सहन करावा लागत आहे.

नवीन यंत्रणा चुकीची : अमरमहल जंक्शनवर सहा पोलिसांची आवश्यकता आहे, परंतु येथे दोन किंवा तीनच पोलीस असतात. तर घाटकोपरच्या दिशेने जाण्यासाठी सूचना फलक नाही, एमजीएम रस्त्यावर आणि टेंभीपूलच्या सिग्नलजवळ पट्टा नसल्यामुळे अनेक चालक पुढे येऊन थांबतात, तसेच या भागात नवीन यंत्रणा चुकीची असून चुकीच्या ठिकाणी वळण दिल्यामुळे अपघाताची शक्यता आहे.सावित्रीबाई पुलाचे स्ट्रक्टरल आॅडिट सहा महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. त्यावेळीच प्रशासनाने जर उपाययोजना केली असती, तर आता तातडीने पूल बंद करण्याची वेळ आली नसती. पूल बंद असल्यामुळे केवळ मोठे रस्तेच नव्हेत, तर अंतर्गत रस्त्यावरही वाहतूककोंडी होत आहे.

अमरमहल परिसरातून कुर्ला किंवा घाटकोपरच्या दिशेने प्रवास करताना जिथे १५ मिनिटे लागत होती, तिथे एक एक तास लागत आहे. काही ठिकाणी जाण्यासाठी रिक्षाचे भाडे २० रुपये होत होते, ते आता ८० ते ९० रुपये होत आहे. प्रवाशांना वाहतूककोंडीच्या तापासोबत आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. -आशा मराठे, प्रभाग समिती अध्यक्ष, एम पश्चिम

टॅग्स :वाहतूक कोंडी