Join us

मुलींचे भविष्य घडविण्याचे खरे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले -अभिनेत्री क्रांती रेडकर 

By मनोहर कुंभेजकर | Published: January 07, 2024 7:41 PM

पुढील पिढी घडविण्यासाठी आपण अमूल्य वेळ देऊन सावित्रीबाई फुले यांचे कार्य पूर्ण केले पाहिजे असे मत रेडकर यांनी व्यक्त केले.

मुंबई : "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे निमंत्रण आपण मला आपुलकीने दिल्याने तुमच्या सर्वांच्या प्रेमापोटी मी आज येथे आली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी प्रचंड काम केले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत प्रस्थापितांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी हे काम केले. ख-या अर्थाने मुलींचे भविष्य घडविण्याचे खरे कार्य सावित्रीबाई फुलेंनी केले आहे," असे ठाम प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी काल रात्री अंधेरीत केले. त्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राच्या महिला विभागाच्या वतीने अंधेरी,चारबंगला येथे आयोजिलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव होते.

क्रांती रेडकर पुढे म्हणाल्या की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी जो शिक्षणाचा पाया घातला ते पुढे म्हणावा तसा चालविला जात नाही. आजही काही ठिकाणी मुलींना शिकवत नाही. तिची अवहेलना केली जाते, तिरस्कार केला जातो अशी खंत व्यक्त केली. पुढील पिढी घडविण्यासाठी आपण अमूल्य वेळ देऊन सावित्रीबाई फुले यांचे कार्य पूर्ण केले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

त्यानंतर या प्रसंगी प्रमुख वक्त्या प्रा. आशालता कांबळे, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या व सुप्रसिद्ध लेखिका भाषणाच्या सुरुवातीला म्हणाल्या की, कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे आंबेडकरी चळवळीचे महान शिलेदार होते. त्यांच्या नावाने संस्था उभारून समाज परिवर्तनाचे मोठे काम या संस्थेतर्फे केले जाते याचे कौतुक करावेसे वाटते.

सावित्रीबाई फुले यांच्याकडे सकारात्मक ऊर्जा होती. त्यामुळे अनेक घाव सोसूनही त्या संघर्ष करत राहिल्या. आज अनेक स्त्रिया शिकून उच्च पदावर गेल्या त्यामागे सावित्रीबाईंचे फार मोठे योगदान आहे हे त्यांनी विसरता कामा नये. या प्रसंगी प्रा. आशालता कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कवितेवर व महात्मा ज्योतिबा फुलेंवर लिहिलेल्या पत्रांचा परामर्श घेतला.

सुरूवातीला महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. बुध्दवंदना घेऊन कार्यक्रम सुरू करण्यात आला. 

पुष्पा धायकोडे यांनी संस्थेचा व पाहुण्यांचा परिचय करून दिला. संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव यांनी  अभिनेत्री क्रांती रेडकर व प्रमुख वक्त्या आशालता कांबळे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. शेवटी मिनल बच्छाव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या प्रसंगी सरचिटणीस चंद्रकांत बच्छाव, उपाध्यक्ष नितीन सोनावणे, कोषाध्यक्ष सदाशिव गांगुर्डे, विश्वस्त नीना हरिनामे, संजय जाधव, सुनिल वाघ, ज्येष्ठ साहित्यिका हिरा पवार, माजी नगरसेविका ज्योत्स्ना दिघे, राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रदेशाध्यक्षा सरोज बिसुरे, शिवसेना (उबाठा) विभागप्रमुख राजेश शेट्ये, रिपाइं (ऐ) महाराष्ट्र महिला आघाडी सचिव ममता अडांगळे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ठोकळे गुरूजी, अंजना गवळे, छाया बनसोडे, रजनी वानखेडे, वैशाली बच्छाव, कावेरी गांगुर्डे व शलाका मखीजा यांनी विशेष प्रयत्न केले. 

टॅग्स :क्रांती रेडकर