सावित्रीबाई फुलेंचा जीवन संघर्ष नाट्यमालिकेच्या रूपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 01:58 AM2021-01-03T01:58:05+5:302021-01-03T01:58:34+5:30
सावित्रीबाई फुले जयंती
राज चिंचणकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सामाजिक व शैक्षणिक विषमता, सती प्रथा यांसारख्या रूढींचे प्रस्थ माजत असताना, क्रांतिबा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्या काळात अत्यंत बिकट परिस्थितीत, प्रसंगी घरच्यांचा व समाजाचा रोष पत्करून, सर्वच वर्गातील स्त्रिया आणि तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवली. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत, त्यांचा हा जीवनसंघर्ष यूट्युबच्या माध्यमातून नाट्यमालिकेच्या रूपात दृश्यमान होत आहे.
रसिकांना या नाट्यमालिकेचा विनामूल्य आस्वाद ‘लाइफ कन्व्हर्टर ग्रुप’ या यूट्युब चॅनेलवरून घेता येणार आहे. जोतिराव आणि सावित्रीबाई यांच्या कार्याला मानाचा मुजरा करण्याच्या हेतूने ‘स्वयंदीप’ या संस्थेने ‘ज्योती सावित्री’ हे नाटक यापूर्वी रंगभूमीवर आणले होते. कविता मोरवणकर व मंगेश पवार यांनी हे नाटक लिहून त्याची निर्मितीही केली होती. आता त्यांनीच नाट्यमालिकेची ही संकल्पना राबवली आहे. सर्वांना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे मिळावे यासाठी जोतिराव व सावित्रीबाई यांनी प्रचंड कष्ट उपसले. इतकेच नव्हे, तर बालसंगोपनगृह, बालिकाश्रम स्थापन करून त्यांनी त्यांचे दातृत्वही सिद्ध केले होते.
जोतिराव फुले यांनी लिहिलेल्या, तसेच सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेल्या ‘बावन्नकशी’, ‘सुबोध रत्नाकर’, ‘काव्यफुले’ आदी ग्रंथांमुळे त्यावेळी समाज परिवर्तनात मोलाची भर पडली होती.
कार्याची ओळख
जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले या क्रांतिकारी दाम्पत्याचे त्या काळातील विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. एकूणच त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची ओळख सर्वांना व्हावी या हेतूने, आम्ही यापूर्वी केलेले नाटक विस्तृतपणे नाट्यमालिकेच्या माध्यमातून सादर करत आहोत, अशी प्रतिक्रिया कविता मोरवणकर यांनी दिली.