जव्हार : वाडा व भिवंडी ग्रामीण विधानसभेमध्ये सलग पाच वेळा व आता विक्रमगड विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आलेल्या कॅबिनेटमंत्री विष्णू सवरा यांचे जव्हार येथील श्रीराम मंदिर येथे रविवारी भव्य स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सवरा यांनी सर्वांनी मतभेद विसरुन विकासाासठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर सवरा यांनी आपल्या विक्रमगड विधानसभा क्षेत्रात दौरा केला. यावेळी विक्रमगड, जव्हार, मोखाडा या तीनही तालुक्यात मिरवणूका काढून जंगी स्वागत कार्यकर्त्यांनी केले. सवरा यांना आदिवासी विकास व समाज कल्याण खाते मिळाल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या भागामध्ये पाणी, रस्ता, वीज, कुपोषण, रोजगार हे गंभीर प्रश्न समस्या भेडसावत आहेत. मात्र आता केंद्रामध्ये व राज्यातही भाजपाचे सरकार असल्याने समस्या सोडविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार असल्याचे सवरा यांनी सांगितले आहे. तसेच एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या परिसरातील नागरिक आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जव्हारमध्ये सवरा यांचे जंगी स्वागत
By admin | Published: November 04, 2014 12:17 AM