मुंबई : सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा रविवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविल्यानंतर शिवसेनेकडून नव्या चेहºयाला या पदावर संधी न देता सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे.
जुलै २०१८ मध्येच सावंत यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना त्यांचे मंत्रीपद कायम ठेवले गेले. असे मंत्रीपद सहा महिने सांभाळता येते. सहा महिन्यांची ही मुदत ७ जानेवारी रोजी संपली.या परिस्थितीत सावंत यांना मंत्री म्हणून संधी द्यायची तर त्यांना राजीनामा देऊन पुन्हा मंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली असती. तथापि, शिवसेनेने त्यांना संधी दिली नाही. मातोश्रीशी असलेली डॉ.सावंत यांची असलेली जवळीक त्यांने मंत्रीपद वाचवू शकली नाही. त्यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला. सूत्रांनी सांगितले की, आरोग्य मंत्रीपदाबाबत काय करायचे या विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. ठाकरे यांनी या पदाचा अतिरिक्त कार्यभार एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवावा असे सांगितले आणि त्यानुसार निर्णय घेण्यात आला. शिवसेनेकडून डॉ.सावंत यांच्याऐवजी कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा होती.टीका टाळण्यासाठी...भाजपा-शिवसेनेतील संबंध सध्या कमालीचे ताणले गेले आहेत. सेना सरकारमधून कुठल्याही क्षणी बाहेर पडेल अशी चर्चा असताना दुसरीकडे शिवसेनेने नव्या चेहºयाला संधी दिली असती तर शिवसेनेवर दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप झाला असता. ही टीका टाळण्यास ठाकरे यांनी आरोग्य मंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार शिंदे यांच्याकडे सोपविण्याला पसंती दिल्याचे म्हटले जाते.