सावंतवाडीतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

By admin | Published: February 4, 2017 08:52 PM2017-02-04T20:52:38+5:302017-02-04T20:52:38+5:30

काँग्र्रेसला ऐन निवडणुकीत दे धक्का... : मंगेश तळवणेकरांसह तीन पदाधिकारी

Sawantwadi activists enter Shiv Sena | सावंतवाडीतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

सावंतवाडीतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Next

सावंतवाडी : काँग्रेसच्या तीन विद्यमान पंचायत समिती सदस्यांसह माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी शुक्रवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे शिवबंधन बांधले. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यात काँग्रेसला हा मोठा धक्का बसला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले असताना सावंतवाडी तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. सगळ्याच पक्षात कार्यकर्त्यांचा प्रवेश सुरू असून, प्रत्येकाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठीच पक्षप्रवेश केले जात आहेत.
काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य असलेले इन्सुली येथील नारायण ऊर्फ बबन राणे, विलवडेचे माजी उपसभापती विनायक दळवी, तर माडखोलच्या सुनयना कासकर यांनी आपला सदस्यपदाचा राजीनामा सभापती प्रमोद सावंत यांच्याकडे सोपवत शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला.
या प्रवेशामुळे त्या भागातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. या तिघांच्या सेना प्रवेशामुळे काहीजण नाराज आहेत. तर काहीजण आनंदी असल्याचे समजते. मात्र, या तिघांच्या सेना प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे.
दुसरीकडे मूळ काँगे्रसचे व राजन तेली समर्थक असलेले बांदा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य सुशांत पांगम, त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या अर्चना पांगम, श्रीकृष्ण काणेकर, सातार्डाचे माजी सरपंच उदय पारिपत्ये, उमा पारिपत्ये, श्रीकांत पारिपत्ये यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेतील प्रवेशामुळे पंचायत समितीचे तिकीट कोणाला मिळते हे पाहावे लागेल. मात्र, तळागाळात रुतलेल्या काँगे्रसला धक्का देण्यास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सुरुवात केली आहे. शहरातील वैश्यभवन हॉलमध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांशी पालकमंत्री केसरकर यांनी शुक्रवारी चर्चा केली. यावेळी हा प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी वेंगुर्ले, दोडामार्ग भागातीलही काही पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनीही सेनेत प्रवेश केला. यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, प्रकाश परब, सावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, आदी उपस्थित होते. यादरम्यान तीनही तालुक्यांतील इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. (वार्ताहर)

Web Title: Sawantwadi activists enter Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.