मुंबई - मालाड येथील मैदानाला टिपू सुलतानाचे नाव दिल्यावरुन सुरु असलेला वाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे आहेत. या मैदानाचे नामकरण 'झाशीची राणी लक्ष्मीबाई' करण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पालिकेच्या महासभेत या प्रस्तावावर काय निर्णय घेतला जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी २६ जानेवारी या मैदानाचे उद्घाटन केले. टिपू सुलतान मैदान असे याचे नामकरण करण्यात आले आहे. यावर भाजपने यावर आक्षेप घेत आंदोलनही केले होते. त्यानंतर आता उपमहापौर अँड. सुहास वाडकर, मालाडच्या पी उत्तर प्रभाग समिती अध्यक्षा संगीता सुतार, कांदिवलीतील शिवसेनेचे नगरसेवक एकनाथ हुंडारे, नगरसेविका गीता लक्ष्मीबाई यांनी या मैदानाचे नामकरण झाशीची राणी लक्ष्मीबाई असे करण्याची मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली.
महापौरांनी हे पत्र बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्ष प्रतिमा खोपडे यांना पाठविले होते. त्यानंतर बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत ही मागणी मंजूर करण्यात आली आहे. आता यावर पालिका आयुक्तांचा अभिप्राय मागविण्यात येणार आहे. तसेच पालिका महासभेत या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. मात्र मैदानाच्या नामकरणावरुन कोणतेही राजकारण न करता हा प्रस्ताव मागे घेण्यात यावा, असे मत समाजवादी पक्षाचे गटनेते व आमदार रईस शेख यांनी व्यक्त केले आहे.