Join us

यंदाच्या शिक्षकदिनी सोशल मीडियावर म्हणा ‘थँक अ टीचर’; शिक्षण विभागाची संकल्पना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 1:47 AM

. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात जे आमूलाग्र बदल झाले, जी प्रगती झाली ती शब्दरूपाने व्यक्त करण्यासाठी ‘थँक अ टीचर’ ही मोहीम शिक्षण विभागाकडून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई : कोविड काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ज्ञानदानाचे कार्य शिक्षक करत आहेत. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात जे आमूलाग्र बदल झाले, जी प्रगती झाली ती शब्दरूपाने व्यक्त करण्यासाठी ‘थँक अ टीचर’ ही मोहीम शिक्षण विभागाकडून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मोहीम फेसबुक, टिष्ट्वटर आणि इन्स्टाग्राम हॅण्डलवरून राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. समाजातील सर्व घटकांनी सोशल मीडियाद्वारे ही मोहीम राबविण्याचे आवाहनही विभागाकडून करण्यात आले आहे.कोविड १९ च्या काळात शाळा बंद असल्या तरी शिक्षक विविध उपक्रम, माध्यमे यांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या उपक्रमांच्या यशोगाथांचे सादरीकरण केंद्र, जिल्हा व तालुका स्तरावर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. शाळा बंद असल्या तरी वाडी, वस्त्या, तांडे, दुर्गम व शहरी भागातील शिक्षकांसोबत काही स्वयंसेवक, शिक्षक मित्र, शिक्षण देण्याचे काम स्वयंस्फूर्तीने करत आहेत. अशा व्यक्तींचे तालुका व जिल्हा स्तरावर परिसंवाद आयोजित करून त्यात पालकांना सहभागी करून घेण्याचा उपक्रमही या मोहिमेत समाविष्ट करण्यात आला आहे.‘थँक अ टीचर’ या मोहिमेमध्ये शक्य असेल तेथे चित्रपट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांचा समावेश असावा तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक, संशोधन, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. या मोहिमेचे नियोजन ५ ते १० सप्टेंबर या कालावधीत करायचे असून एकत्रीकरण करून ते शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर पाठविण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.येथे करू शकणार शिक्षकांविषयीच्या भावना व्यक्त thxteacher @thxteacher @thankuteaccher 

टॅग्स :शिक्षकशाळाविद्यार्थी